गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर भारत WTC अंतिम फेरी गाठणार का? कसं असेल पुढचं गणित जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉच्या दिशेने झुकला आहे. भारताने चौथ्या दिवशी 9 गडी बाद 252 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 193 धावांची आघाडी आहे. असं असताना एक विकेट घेताना किती वेळ जातो आणि किती धावांचं आव्हान भारतासमोर ठेवायचं यावरून पाचव्या दिवशी काय ते ठरणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीवर काय परिणाम होईल, याची चर्चा रंगली आहे. कारण भारताला अंतिम फेरी गाठायची तर उर्वरित सर्व सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. असं असताना तिसरा सामना ड्रॉ झाला तर उर्वरित दोन सामन्यात काय केलं तर अंतिम फेरी गाठता येईल. पाचव्या दिवशी गाबा कसोटी पावसाचा व्यत्यय पडला तर सामना ड्रॉ होईल असंच दिसत आहे. गाबा कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी 4 गुण मिळतील. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण 114 गुण होतील आणि भारताची विजयी टक्केवारी ही 55.88 टक्क्यांपर्यंत घसरेल. त्यामुळे भारताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागेल. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 58.88 असेल आणि दुसऱ्या स्थानावर राहील. तर दक्षिण अफ्रिका 63.33 विजयी टक्केवारीसह अव्वल स्थान राहील.
गाबा कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारतापुढे पुढचे दोन सामने जिंकण्याशिवाय पर्याय नाही. एकही सामन्यात पराभव झाला तर भारताचं अंतिम फेरीचं गणित फिस्कटणार आहे. गुणतालिकेत दुसरं स्थान गाठण्यासाठी भाराताला शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील. अन्यथा एका सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ करावा लागेल. अन्यथा भारताचं पहिल्या दोन स्थानावर पोहोचणं कठीण होईल.
दक्षिण अफ्रिकेचे शेवटचे दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध आहेत. यापैकी एक सामना जिंकला की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत स्थान पक्कं होणार आहे. पण दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं तर गणित बदलेल. त्यात ऑस्ट्रेलिया भारतानंतर श्रीलंकेशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेने दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारताला काही अंशी संधी मिळू शकते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्रॉच्या दिशेने झुकलेला आहे. भारताने चौथ्या दिवशी पहिल्या डावात 9 गडी गमवून 252 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 193 धावांची आघाडी आहे. भारताकडून आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह ही जोडी मैदानात आहे. या जोडीने भारतावरील फॉलोऑनचं संकट टळलं. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी 54 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली आहे. आकाश दीप नाबाद 27, तर बुमराह नाबाद 10 धावांवर खेळत आहेत.