बांगलादेशमधील टी20 वुमन्स वर्ल्डकप भारतात होणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं की…
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. हिंसाचारामुळे बांगलादेशमधील स्थिती गंभीर झाली आहे. इतकंच काय तर पंतप्रधानांना देशातून पळ काढावा लागला आहे. असं असताना वुमन्स टी20 वर्ल्डकपचं आयोजन बांगलादेशमधून इतरत्र हलवण्याचा विचार सुरु आहे. यावर बीसीसीआय सचिन जय शाह यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. देशातील राजकीय स्थितीही गंभीर झाली आहे. अशा स्थितीत बांगलादेशमध्ये वुमन्स टी20 वर्ल्डकपचं आयोजन करणं आयसीसीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आयसीसी ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बांगलादेशने बीसीसीआयकडे स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. पण बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून बांगलादेशमधील दोन ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. जय शाह यांनी सांगितलं की, ‘बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताला महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.’
जय शाह यांनी सांगितलं की, ‘पुढच्या वर्षी आम्ही 50 षटकांचा महिला वनडे वर्ल्डकपचं आयोजन करणार आहोत. आम्हाला सलग वर्ल्डकपचे आयोजन करायचे नाही. बांगलादेशने बीसीसीआयला यजमानपदाबाबत विचारलं होतं. पण आम्ही स्पष्ट नकार दिला आहे. आता पाऊस सुरु आहे आणि पुढच्या वर्षी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करायचं आहे.’
वुमन्स टी20 वर्ल्डकप 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलँड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. दोन्ही गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य फेरीचा सामना 17 आणि 18 ऑक्टोबरला असेल. भारत पाकिस्तान सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे.
बांगलादेशचा पुरुष संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात गेला आहे. देशातील स्थिती पाहता ठरलेल्या वेळेच्या आधीच बांगलादेश संघ पाकिस्तान पोहोचला आहे. या दौऱ्यात बांगलादेश संघ दोन कसोटी आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येईल. जय शाह म्हणाले की, “आम्ही या दौऱ्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली नाही. तिथे एका नव्या सरकारने कार्यभार हाती घेतला आहे. ते आमच्याशी संपर्क साधतील किंवा आम्ही त्यांच्याशी संपर्क करू. बांगलादेश कसोटी मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे.”