WInd vs WAus 1st T20I | टीम इंडियाची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने मात
India Women vs Australia Women 1st T20I Match Result | वूमन्स टीम इंडियाचा 2024 वर्षातील हा पहिलाच विजय ठरला आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात कांगारुंना पाणी पाजत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
नवी मुंबई | वूमन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी 20 सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान अवघी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघी टीम इंडियाच्या विजयाच्या नायिका ठरल्या. या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने 142 धावांचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. या दोघींनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. इतकंच नाही, तर 137 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाचा विजय निश्चित केला. मात्र विजयाजवळ आल्यानंतर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. स्मृती मंधाना ही 54 धावांवर आऊट झाली. स्मृतीने या खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स लगावला. त्यानंतर शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहने नाबाद 6 धावा केल्या. तर शफालीने 44 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेअरहम हीला एकमेव विकेट मिळाली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने 19.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 141 धावा केल्या. ऑस्टेलियाकडून फोबी लिचफील्ड हीने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर एलिस पेरी हीने 37 धावांचं योगदान दिलं. या दोघींशिवाय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इतर एकालाही मोठी खेळी करुन दिली नाही. टीम इंडियाकडून तितास साधूने 4 फलंदाजांना आऊट केलं. श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रेणूका सिंह आणि अमनज्योत कौर या दोघींना 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
A thumping win for India as they beat the Aussies by nine wickets to take a 1-0 lead in the T20I series 👏#INDvAUS 📝: https://t.co/FdM3EktCfK pic.twitter.com/D0WuYva6T3
— ICC (@ICC) January 5, 2024
दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी 7 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात उभयसंघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, मेगन शट आणि डार्सी ब्राउन.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.