WITT : दोन्ही हात नाहीत तरी षटकार आणि चौकारांचा पाऊस, क्रिकेटपटूच्या कर्तृत्वाची टीव्ही 9 कडून दखल
जम्मू काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दोन्ही हात नाहीत तरी उत्तम क्रिकेट खेळतो. त्याच्या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे. टीव्ही 9 ने त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच दिल्लीत होणाऱ्या WITT समिटमध्ये त्याचा गौरव करण्यात येणार आहे
मुंबई : स्वप्न पूर्ण करताना कधीच कोणत्या गोष्टीची उणीव भासत नाही. रोज एक एक पाऊल आपसूक ध्येयाकडे पडत असतं. मागे वळून पाहताना आपण बराच पल्ला गाठलेला असतो. मग एक दिवस आपल्या अचाट कतृत्वाची दखल संपूर्ण समाजाला घ्यावी लागते. अशीच काहिशी अचाट कामगिरी जम्मू काश्मीरचा क्रिकेटपटू आमिर हुसैन लोन याने केली आहे. दोन्ही हात नसताना खचून गेला नाही. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती आणि त्याने करून दाखवलं. अखेर त्याच्या दिव्य कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. आता टीव्ही 9 नेटवर्कने त्याच्या कर्तृत्वाची दखल घेतली आहे. त्याच्या कामगिरीला मान देत गौरव करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क टीव्ही 9चा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विशेष कार्यक्रमात त्याचा सन्मान होणार आहे. 25 फेब्रुवारीपासून तीन दिवस हा कार्यक्रम दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत.
कोण आहे आमिर हुसैन लोन?
आमिर हुसैन लोन हा जम्मू काश्मिरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. गेल्या 11 वर्षांपासून व्यवसायियक क्रिकेट खेळत आहे. दोन्ही हात नसताना उत्कृष्ट फलंदाजी करतो. तसेच गोलंदाजीतही भल्याभल्यांची दाणादाण उडवून देतो. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही त्याचे व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच त्याची कामगिरी पाहून चाहते झाले आहेत. त्यांनी गौतम अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिरला मदतीचा हातही पुढे केला आहे.
गौतम अदानी यांनी आमिरसाठी सोशल मीडिया हँडल ट्विटरवर एक खास पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, आमिरच्या धैर्याला, खेळाप्रती समर्पण आणि प्रतिकूल परिस्थितीत कधीही हार न मानण्याच्या त्याच्या भावनेला सलाम करतो.
वयाच्या आठव्या वर्षी अपघाताचा बळी
आमिर हुसैन लोन 8 वर्षांचा असताना त्याच्यासोबत एक दुर्दैवी अपघात झाला. वडिलांच्या मिलमध्ये त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. त्यात त्याने आपले दोन्ही हात गमावले. पण इतकं होऊनही आमिर हुसैनची क्रिकेटची आवड काही संपली नाही. दोन्ही हात गमावूनही तो क्रिकेट खेळत राहिला. फलंदाजीसाठी आमिरने खांदे आणि मानेमध्ये बॅट पकडायला शिकला आणि त्यात तरबेज झाला. तसेच गोलंदाजी पायाने करू लागला.