T20 World Cup 2024, NZ vs WI : उपांत्य फेरीत न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आमनेसामने, असा लागला नाणेफेकीचा कौल
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. एका बाजूने दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज सामन्यातील निकालानंतर कळेल. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तूल्यबळ लढत होणार आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी नवा विजेता मिळणार की नाही याचा फैसला आज उपांत्य फेरीत होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. वेस्ट इंडिजने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी एकदाही जेतेपदाला गवसणी घातलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. न्यूझीलंडने गट अ मध्ये चार पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात भारताला 58 धावांनी, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव, तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे वेस्ट इंडिजनेही चार पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून पराभव झाला. त्यानंतर स्कॉटलंड, बांग्लादेश आणि इंग्लंडला मात दिली.
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना शारजाहमध्ये होत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने सांगितलं की, आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही मोठी धावसंख्या करून वेस्ट इंडिजवर दबाव आणू. व्यस्त वेळापत्रकात आम्हाला दोन दिवसांचा आराम मिळाला ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सरावात काही गोष्टी नव्याने करता आल्या आहेत. आम्ही त्याच संघासह उतरणार आहोत.
वेस्ट इंडिजची कर्णधार मॅथ्यूजने सांगितलं की, आम्हाला पहिली गोलंदाजी करायची होती. आता फक्त दोन विजयांचं अंतर आहे. आम्ही यासाठी खूपच उत्साहित आहोत. संघात एक बदल केला आहे. स्टॅफनी टेलरला संघात स्थान मिळालं आहे. तर नेशनला आराम दिला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, स्टॅफनी टेलर, चिनेल हेन्री, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास