वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न होता. पण तसं काही झालं नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी दक्षिण अफ्रिकेच्या मनासारखा झाला होता. तसंच काही पुढे सामन्यात घडलं. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 106 धावा केल्या आणि विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 17.2 षटकात पूर्ण केलं. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशवर 7 विकेट आणि 16 चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘पॉवरप्लेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली ती चांगली नव्हती. जेव्हा तुम्हाला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात मिळत नाही, तेव्हा ते कठीण गेलं. आम्ही भागीदारी बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही बरेच डॉट खेळलो. माझ्या संघात अनेक तरुण खेळाडू आहेत. राबेयाने शेवटच्या 4 सामन्यांमध्ये मारुफा आणि शोरना यांनी चमकदार गोलंदाजी केली. आम्ही अनेक सकारात्मक गोष्टी पुढे नेऊ शकतो आणि आम्ही पहिला गेम जिंकल्यानंतर काय चूक झाली यावर आम्ही विचार करू.”
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने सांगितलं की, “विजय मिळवणे खरोखर चांगले आहे, आम्ही ज्या पद्धतीने चेंडूने सुरुवात केली ती उत्कृष्ट होती. आम्हाला त्याचा पाठलाग जरा लवकर करायला आवडला असता, आम्ही प्रयत्न केला. एक संदेश आला जो पाठवला गेला होता पण तिथे पोहोचला नाही. पण विजय ही मुख्य गोष्ट आहे. आम्ही इतर निकालांची प्रतीक्षा करू आणि आशा आहे की आम्ही उपांत्य फेरीत जागा बुक करण्यासाठी पुरेशी कामगिरी केली आहे. कॅप्पी बॅट आणि बॉलने अविश्वसनीय आहे आणि आज तिचा इकॉनॉमी रेट जबरदस्त होता.”
बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्टर, शाठी राणी, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकीपर कर्णधार), मुर्शिदा खातून, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.