भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाची धूळ खाल्ली. तर पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत विजयी ट्रॅक पकडला होता. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात निकालाचा पूर्ण प्रभाव दिसत होता. पाकिस्तानच्या विकेट झटपट बाद झाल्यानंतरही भारतीय संघात बऱ्याच उणीवा दिसल्या. खासकरून भारतीय संघाचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहून क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हातात असलेले सोपे झेल सोडल्याने धावगती रोखणंही कठीण होत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमवून 105 धावा केल्या आणि 106 धावा जिंकायला दिल्या आहेत. भारताने हे आव्हान 12 षटकात पूर्ण केलं तर नेट रनरेट सुधारण्यास मदत होणार आहे.दरम्यान, पाकिस्तानला 100 धावांच्या आता रोखण्याची भारताला संधी होती. पण भारताला काही चुका महागात पडल्या. पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताला फक्त जिंकायचा नाही तर नेट रनरेटही सुधारायचा आहे. त्यामुळे भारताला अशा चुका करणं चांगलंच महागात पडू शकतं. भारताला पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेशी सामना करायचा आहे.
आशा शोभनाने दोन सोपे झेल सोडल्याने धावगती कमी करण्यात अपयश आलं. फातिमा सानाने तर मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला. आशा शोभनाच्या षटकातच सलग दोन चौकार मारले. दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौरही निर्णय घेताना चाचपडत असल्याचं दिसून आलं. खासकरून शेवटच्या षटकात भारताला त्याचा फटका बसला. स्लो ओव्हर रेटमुळे भारताला शेवटच्या षटकात पेनल्टी बसली. तसेच एक अतिरिक्त खेळाडू रिंगणात आणावा लागला. त्याचा फायदा पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर झाला. सर्कलबाहेर एक खेळाडू कमी असल्याने चौकार मिळाला. त्यामुळे पाकिस्तानला 105 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह, सादिया इक्बाल.