IND vs PAK : भारत पाकिस्तान यांच्यात ‘काँटे की टक्कर’, टी20 क्रिकेटमध्ये दिग्गज आमनेसामने
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जबरदस्त खेळत आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील प्रत्येकी दोन सामने जिंकले आहे. गुणतालिकेत भारत अव्वल, तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की दोन्ही बाजूचे क्रीडारसिक आक्रमक होतात. मग तो कोणताही सामना असो..वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2024 स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघातील दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र त्यांची क्रेझ आजही कायम आहे. आपल्या दिग्गज खेळाडूंना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा मिळणार आहे. त्याच भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रिकेटपटूंपेक्षा क्रीडाप्रेमींचा जोश काही वेगळा असतो. बर्मिंघमच्या एजबेस्टनमद्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघ युवराज सिंगच्या नेतृत्वात, तर पाकिस्तान संघ यूनुस खानच्या नेतृत्त्वात खेळणार आहे. विशेष म्हणजे या हायव्होल्टेज सामन्यातील 23 हजार सीट्स बुकिंग झाल्या आहेत. यावरूनच दोन्ही संघातील क्रीडाप्रेमींचा उत्साह अधोरेखित होतो.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाने सांगितलं की, “पाकिस्तानविरुद्ध खेळणं कायमचं सन्मानाची गोष्ट असते. हा सामना काही अपवाद नाही. मैदानात आमचा संघ पूर्ण जोशात उतरणार आणि सर्वस्व देण्यासाठी सज्ज असेल. आम्हाला आशा आहे की, आमचं प्रदर्शन चाहत्यांना अद्भूत ऊर्जा आणि समर्थन देण्यासाठी सन्मानित करेल.” तर पाकिस्तानचा कर्णधार यूनुस खानने सांगितलं की, “या प्रतिष्ठीत स्पर्धेत आम्ही भारताविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून द्वंद्व सुरु आहे. आमच्या संघाने चांगली तयारी केली आहे. निश्चितच आम्ही चांगलं प्रदर्शन करू.हा काही साधासुधा सामना नाही.”
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत चॅम्पियन्स संघ: रॉबिन उथप्पा, नमन ओझा (विकेटकीपर), सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णदार), गुरकीरत सिंग मान, इरफान पठाण, युसूफ पठाण, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा, अंबाती रायडू, पवन नेगी.
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ: कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शोएब मलिक, युनूस खान (कर्णधार), मिसबाह-उल-हक, शाहिद आफ्रिदी, अब्दुल रज्जाक, आमेर यामीन, वहाब रियाझ, सईद अजमल, तौफीक उमर, मोहम्मद हाफिज, यासिर अराफात, सोहेल तन्वीर, सोहेल खान, उमर अकमल, तन्वीर अहमद.