World Cup 2023 Points Table : उपांत्य फेरीसाठी जागा 2 आणि संघ 4, अफगाणिस्तानच्या विजयाने असं बदललं गणित
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन जागा शिल्लक आहेत. तर दक्षिण अफ्रिकेचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दोन जागांसाठी चार संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा समावेश आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजत अफगाणिस्तानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अफगाणिस्तानने तीन दिग्गज संघांना धक्का दिला आहे. यात पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर नेदरलँडला पराभूत करत तीन दिग्गज संघांच्या वाटेत अडसर निर्माण केला आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमध्ये रंगलेल्या सामन्यात नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानचा आत्मविश्वास इतका दुणावला आहे की, नेदरलँडला 179 धावांच्या पुढे मजलच मारता आली नाही. संपूर्ण संघ 179 धावांवर बाद झाला आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 3 गडी गमवून 31.3 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. चला जाणून घेऊयात गुणतालिकेचं गणित..
भारताने सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेचंही उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित आहे. दक्षिण अफ्रिकेने 7 पैकी सहा सामने जिंकत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन संघांसाठी चार संघांमध्ये चुरस आहे. यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे संघ शर्यतीत आहेत.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
जाणून घ्या उपांत्य फेरीचं गणित
- दक्षिण अफ्रिकेचे दोन सामने उरले असून 5 नोव्हेंबरला भारताशी, तर 10 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना आहे. यापैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल.
- ऑस्ट्रेलियाचे तीन सामने उरले आहेत. तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवल्यास सहज उपांत्य फेरी गाठेल. 4 नोव्हेंबरला इंग्लंड, 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तान, तर 11 नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना होणार आहे. दोन सामन्यात पराभव झाल्यास नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
- न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे दोन सामने उरले आहेत. त्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयी संघांचं उपांत्य फेरीत वाट मोकळी होईल. तर एकाच आव्हान संपुष्टात येईल. न्यूझीलंडचा पुढचा सामना श्रीलंकेशी 9 नोव्हेंबरला होणार आहे. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडशी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
- अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या रेसमध्ये आहे. पण उर्वरित दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दिग्गज संघांशी आहेत. त्यामुळे दोन्ही सामने जिंकल्यास उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे.