World Cup 2023 : युवराज सिंगच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ, भारत जिंकणार की नाही थेटच सांगून टाकलं
गेल्या दहा वर्षात टीम इंडियाची आयसीसी स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये आशेचा किरण आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : आयसीसी स्पर्धेतील चषकांचा दुष्काळ गेल्या दहा वर्षांपासून कायम आहे. टी20 वर्ल्डकपनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे आता वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरणार आहे. मात्र टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या स्पष्ट वक्तव्याने क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. युवराज सिंगने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यावर स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. या मुलाखतीत युवराज सिंगला भारत यंदाचा वनडे वर्ल्डकप जिंकणार की नाही? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणला युवराज सिंग?
‘खरं सांगायचं तर भारत हा वर्ल्डकप जिंकेल की नाही याबाबत मी स्पष्ट काही सांगू शकत न नाही. पण एका देशप्रेमींच्या नजरेतून पाहिलं तर भारत जिंकावा हेच स्वप्न आहे. पण मधल्या फळीच्या फलंदाजांची दुखापती पाहता खूप चिंता वाटते. भारताला वर्ल्डकपमध्ये निराशाजनक कामगिरी करताना पाहणं दु:खद असेल, पण हे असंच आहे.’, असं माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने सांगितलं.
“भारताची टॉप ऑर्डर एकदम मस्त आहे. पण मधल्या फळी सुधारण्याची आवश्यकता आहे. चौथा आणि पाचवा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये फ्रेंचाईसीसाठी चौथ्या क्रमांकावर खेळतो तर त्याने भारतासाठीही चौथ्या क्रमांकावर खेळणं गरजेचं आहे. या क्रमांकावर जलदगतीने फलंदाजी करण्यापेक्षा दबाव झेलणारा फलंदाज असायला हवा.”, असंही युवराज सिंग याने पुढे सांगितलं.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा
आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासोबत आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान, 15 ऑक्टोबरला पाकिस्तान, 19 ऑक्टोबरला बांगलादेश, 22 ऑक्टोबरला न्यूझीलंड, 29 ऑक्टोबरला इंग्लंड, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 6 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि 11 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना होणार आहे.