World Cup : “चाहत्यांनी आमच्याकडून जास्त अपेक्षा…”, कर्णधार रोहित शर्मा याने कान टोचले
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरली आहे. यावेळी जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी असून रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होणार आहे. म्हणजेच साखळी फेरीत प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. दुसरीकडे ही स्पर्धा भारतात होत असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय क्रिकेट फॅन्सनाही टीम इंडियाकडून तशाच अपेक्षा आहेत. पण फॅन्सच्या इच्छा भारतीय संघ आणि खेळाडूंना किती त्रासदायक आहे याचं उत्तर कर्णधार रोहित शर्मा याने दिलं.
‘आमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका’
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘चाहत्यांच्या अपेक्षांवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. पण मला आनंद तेव्हा वाटेल जेव्हा फॅन्स आमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणार नाहीत. सध्या आम्ही जिथे पण जातो मग ते एअरपोर्ट असो की हॉटेल प्रत्येक जण आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे असंच म्हणत आहे. जर चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं जास्त नसतील तर आम्हाला बरं वाटेल. पण आम्ही फॅन्सच्या अपेक्षांवर कंट्रोल ठेवू शकत नाही.’
गेल्या 10 वर्षात आयसीसी स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही चषक जिंकलेला नाही. वनडे वर्ल्डकप जिंकूनही 12 वर्षांचा काळ लोटला आहे. 2015 आणि 2019 वर्ल्डकप स्पर्धेत पदरी निराशाच पडली. आता भारतात 12 वर्षानंतर स्पर्धा होत आहे. त्यामुळे 2011 ची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.