Team India : धर्मशाळामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूवर मधमाशीचा हल्ला! सराव सोडून फलंदाजाची पळापळ
World Cup 2023, IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची क्रीडाप्रेमींना प्रतिक्षा लागून आहे. हार्दिक पांड्या जखमी, त्यात पावसाचं सावट असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे, सरावादरम्यान खेळाडूवर मधमाशीने अटॅक केल्याने त्यात टेन्शन वाढलं आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची कसोटी लागणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला ग्रहण लागलं आहे. हार्दिक पांड्या जखमी असल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. हार्दिक बॅट आणि बॉल दोन्ही ठिकाणी भूमिका बजावतो. त्यामुळे अष्टपैलू जागा भरायची म्हणजे रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी टीममध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव यांच्या नावाची चर्चा आहे. पण सामन्याच्या एक दिवसाआधी टीम इंडियाच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समरो आली आहे. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज इशान किशन याला मधमाशीने दंश केला आहे. त्यामुळे सराव सोडून त्याने मैदानातून पळ काढला आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी इशान किशन नेट प्रॅक्टिस करत होता. मोहम्मद सिराज त्याला गोलंदाजी करत होता. सराव करत असताना मधमाशीने दंश केला. सुरुवातीला काय झालं? हे त्याला कळलंच नाही. मग त्याने बॅट फेकत तेथून पळ काढला. इशान मान पकडतच मैदानाबाहेर आला. यापूर्वी आयपीएलमध्ये इशानच्या डोळ्याखाली चेंडू लागला होता. त्यावेळी लगेच सूज आली होती. त्यामुळे सामन्यात खेळला नव्हता.
दुसरीकेड सूर्यकुमार यादव यालाही दुखापत झाली आहे. सराव करताना त्याच्या उजव्या हाताला चेंडू लागला. त्यामुळे त्याने लगेच सराव सोडला आणि सपोर्ट स्टाफची मदत घेतली. त्यानंतर फिजियोने आइस पॅक लावण्यास सांगितलं. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात कोण खेळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव जखमी असतील तर आर अश्विनला संधी मिळू शकते.
गुणतालिकेत अव्वल स्थान आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. न्यूझीलंड आणि भारताचे समसमान 8 गुण आहेत. पण नेट रनरेटने न्यूझीलंडचा संघ पुढे असून अव्वल स्थानी आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंड भारत सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे साखळी फेरीतील सामना झाला नव्हता. तसेच उपांत्य फेरीत राखीव दिवशी सामना झाला. पण हा सामना टीम इंडियाने 18 धावांनी गमावला.