NZ vs SL : न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक! श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला तरी नेट रनरेट गाठणं खूपच कठीण आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना उपांत्य फेरीत असेल.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 41 सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात रंगला. हा सामना उपांत्य फेरीसाठी खूपच महत्त्वाचा होता. न्यूझीलंडने श्रीलंकेवर गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. पाकिस्तानला अशक्यप्राय संधी आहे. पण तसं होणं खूपच कठीण आहे. पाकिस्तानने पुढचा सामना जिंकला तरी नेट रनरेट गाठणं सोपं नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड सामना पाहायला मिळेल. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी श्रीलंकेला 171 धावांवर रोखलं. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 172 धावांचं आव्हान गडी राखून पूर्ण केलं. यामुळे नेट रनरेटही चांगला झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं उपांत्य फेरी गाठणं शक्यच नाही. उपांत्य फेरीत भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने स्थान मिळवलं आहे.
न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनव्हे आणि रचिन रविंद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 86 धावांची खेळी केली. डेवॉन कॉनव्हे 45 धावा करून बाद झाला. तो तंबूत पोहोचत नाही तोच रचिन रविंद्रही बाद झाला. महीश थीक्षणा 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर केन विल्यमसन आणि डेरिल मिचेल यांनी मोर्चा सांभाळला. पण केन विल्यमसनला अँजेलो मॅथ्यूजने तंबूत पाठवलं. अवघ्या 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्क चॅपमॅन 7 धावांवर धावचीत झाला. डेरिल मिचेलने संघाला विजयाच्या वेशीवर आणून ठेवलं पण 43 धावा करून तंबूत परतला.
श्रीलंकेचा डाव
श्रीलंकेची सुरुवात एकदम खराब झाली. पाथुम निसंका स्वस्तात म्हणजे 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर बाद होण्याची शर्यतच सुरु झाली. कुसल परेरा यानेच 51 धावांची खेळी केली. या व्यक्तिरिक्त सहा खेळाडू एकेरी धावसंख्या करून तंबूत परतले. महीश थीक्षाणा याने शेवटी काही धावा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. थीक्षाणा 38 धावा करून नाबाद राहीला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने 3, लॉकी फर्ग्युसन याने 2, मिचेल सँटनर याने 2, रचिन रविंद्र याने 2 आणि टिम साऊथीने 1 गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टॉम लॅथम (विकेटकीपर), टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशनका.