Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप वेळापत्रकावरुन माजी गृहमंत्र्यांची नाराजी, म्हणाले मुंबई आणि पुण्याच्या पलीकडे..
ICC World Cup 2023 Schedule | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. देशातील 10 विविध शहरात वर्ल्ड कप सामने खेळवण्यात येणार आहेत.
मुंबई | भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला 2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आयसीसीने या बहुप्रतिक्षित वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी 27 जून रोजी जाहीर केलं. आयसीसीने 100 दिवसांआधी वेळापत्रक प्रसिद्ध केलं. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपमधील पहिला आणि अंतिम सामना होणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्याचं आयोजन हे भारतातील 10 शहरांमध्ये करण्यात आलंय. तर 3 शहरात सराव सामने खेळवण्यात येणार आहे. यावेळेस बऱ्याच स्टेडियममध्ये एकही वर्ल्ड कप मॅचचं आयोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांनी तिरुवनंतरपूरममध्ये सामन्याचं आयोजन न करण्यावरुन जाहीर नाराजी व्यक्त केली.
आता त्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख यांनीही उघडउघड नाराजी जाहीर केली आहे. देशमुख यांनी ट्विट करत विदर्भाला वगळण्यात आल्याचं म्हटलं. तसेच नाराजी बोलून दाखवलीय. तसेच अनिल देशमुख यांच्या पक्षातील सहकारी आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
अनिल देशमुख याचं ट्विट
Extremely disappointed that Nagpur has been ignored for hosting #CWC2023 matches. It has all the facilities in place from a world class stadium to matching city infrastructure. The administration should look beyond Mumbai and Pune and stop ignoring Vidarbha. I request BCCI to…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 28, 2023
अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
“क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी नागपूरमध्ये एकाही सामन्याचं आयोजन करण्यात न आल्याने अत्यंत निराशा झाली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. प्रशासनाने मुंबई आणि पुणे शहरापलिकडेही पाहावं. तसेच विदर्भाकडे दुर्लक्ष करणं थांबवावं. नागपूरमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील काही सामन्याचं आयोजन करण्यात यावं,” अशी विनंती अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटद्वारे केली आहे.
रोहित पवार अनिल देशमुख यांच्या ट्विटवर काय म्हणाले?
साहेब आपण विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी #ICC च्या निकषाप्रमाणे ६ किंवा ८ ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत. पण आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात प्रत्यक्ष १० ठिकाणी सामने तर २… https://t.co/GAagqs4hXH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 28, 2023
रोहित पवार यांनी अनिल देशमुख यांचं ट्विट रिट्विट करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. अनिल देशमुख यांची भूमिका योग्य असल्याचं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. बीसीसीआयने कशाप्रकारे महाराष्ट्रात सर्वाधिक सामन्यांचं आयोजन केलंय हे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रात सर्वाधिक सामन्यांचं आयोजन करण्यात आल्याने रोहित पवार यांनी राज्याच्यावतीने आयसीसी आणि बीसीसीआयचे आभार मानल्यांच म्हटलंय. हे सामने पाहण्यासाठी महाराष्ट्र येणार आहे, आपणही यावंं असं प्रेमळ आमंत्रणही रोहित पवार यांनी अनिल देशमुख यांना दिलंय.