SA vs NED : नेदरलँड विरुद्धचा पराभव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाच्या लागला जिव्हारी, म्हणाला…
World Cup 2023, SA vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत खळबळ उडवून दिली आहे. या पराभवानंतर कर्णधार बावुमाने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ म्हणून संबोधलं जातं. हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी हिरावून नेतो हा इतिहास आजवर क्रीडाप्रेमींनी पाहिला आहे. त्यामुळे यंदा तरी आपल्यावरील हा डाग पुसण्याची दक्षिण आफ्रिकेची धडपड सुरु आहे. कदाचित पुढे जाऊन दक्षिण आफ्रिका चांगली कामगिरीही करेल. पण साखळी फेरीतील पराभवामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साखळी फेरीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या सारख्या दिग्गज संघांना पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुबळ्या नेदरलँडने पराभव केला आहे. आपल्या खात्यात नेदरलँडला पराभूत करून सहज दोन गुण पडतील अशी आशा होती. पण त्यावर पाणी फेरलं गेलं आहे. नेदरलँडने दिग्गज दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला आहे. हा पराभव दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. कर्णधार टेम्बा बावुमा यानेही संताप व्यक्त करत आपलं म्हणणं मांडलं आहे.
काय म्हणाला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा
“मला वाटते की आम्ही 6 बाद 112 धावा केल्या होत्या. तर त्यांना आम्ही 200 च्या पुढे जाऊ द्यायला नको होते. आम्ही कॅच सोडले. क्षेत्ररक्षण ढीसाळ झालं. तरीही विजयी पाठलाग आत्मविश्वासाने करत होतो. पण आमच्या फलंदाजीत उणीव दिसून आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वकाही ठिक होतं. आता पुन्हा एकदा संघ सहकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. कितीही दु:ख झालं तरी हा पराभव पचवावा लागेल. पण स्पर्धा अजून संपलेली नाही. त्यांनी चांगली खेळी केली. आमच्यावर संपूर्ण दबाव टाकला. त्यांना शुभेच्छा.”, असं टेम्बा बावुमा म्हणाला.
नेदरलँडला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेला अव्वल स्थानी जायची संधी होती. पण ही संधी हुकल्याने आता तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागणार आहे. नेदरलँडने विजय मिळवल्याने श्रीलंकेला मागे टाकत नववं स्थान पटकावलं आहे. टीम इंडिया अव्वल स्थानी असून न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.