Video | विराट कोहलीच्या शतकी खेळीत पंचांचा मोलाचा वाटा, ऐन मोक्याच्या क्षणी घेतला असा निर्णय
Virat Kohli | वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. पण यात पंचांचाही मोलाचा वाटा होता अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई : विराट कोहली हा भारताच्या भात्यातील प्रमुख अस्र आहे. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गरज पडली तेव्हा गोलंदाजीही केली. विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संघाची बिकट स्थिती असताना केएल राहुलसोबत महत्त्वाची खेळी केली. चौथ्या गड्यासाठी 165 धावांची भागीदारी केली. तसेच 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विराट कोहली याने नाबाद 55 धावा केल्या. तर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 97 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यामुळे विराट कोहली याचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पण बांगलादेश विरुद्धच्या शतकाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शतकी खेळी करण्यासाठी खटाटोप पाहून नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. पण सर्वात मोठी गंमत म्हणजे विराटचं शतक व्हावं म्हणून पंचांनीही खारीचा वाटा उचलला असंच म्हणावं लागेल.
बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. भारतानं हे आव्हान गाठण्यासाठी 42 षटकं घेतली. 41 षटकात भारताने 3 गडी बाद 255 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी अवघ्या दोन धावांची आवश्यकता होती. नसुम अहमद याच्याकडे 42वं षटक सोपवण्यात आलं. विराट कोहलीच्या 94 चेंडूत 97 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी 2 आणि शतकासाठी 3 धावा अशी स्थिती होती.
नसुम अहमदने पहिलाच चेंडू लेग साइडला टाकला. खरं तर हा चेंडू वाइड होता. पण पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनाही हासू आवरलं नाही. समालोचन करणाऱ्या मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांनीही गंमतीगंमतीत बरंच काही बोलून गेले. पंचांनी एक कटाक्ष विराट कोहलीकडे टाकला आणि गाळातल्या गाळात हसले. हा चेंडू निर्धाव गेला. हा चेंडू वाइड दिला असता तर विजयासाठी अवघी एक धाव हवी असती. तसेच शतक करणं कठीणही होऊ शकलं असतं.
Umpire doesn't give wide to viratBest moment of match. 🤣🤣🤣🤣#indiavsbangladesh #INDvBAN #ViratKohli #ICCCricketWorldCup #INDvBAN #ViratKohli pic.twitter.com/c2pQ6L8rwi
— Nischay Singh Goyal (@NischaySinghGo1) October 19, 2023
Best moment of match.😁
Umpire didn't give wide.#ViratKohli #INDvBANpic.twitter.com/8qWl3F8pRK
— Vijay Tiwari (@VijayonX) October 19, 2023
1 like = 1 clap for Umpire(Richard Kettleborough) for not giving wide#ViratKohli pic.twitter.com/McXe16n82R
— AYUSH 2.0 (@AYUSH16769142) October 19, 2023
नसुम अहमद याचा दुसरा चेंडूही निर्धाव गेला. पण विराट कोहली याने तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला आणि संघाच्या विजयासह नाबाद 103 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना विराट कोहली याचं तिसरं शतक आहे.