World Cup 2023: उपांत्य फेरीत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी सामना! जाणून घ्या पाकिस्तान कसा पोहोचेल ते
IND vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उर्वरित दोन संघांचं काय ठरलं नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं गणित हळूहळू सुटण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड आणि श्रीलंका हे संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. तर भारत आणि दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उपांत्य फेरीच्या आणखी दोन स्थानासाठी चार संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये चढाओढ लागली आहे. सध्याची चढाओढ पाहता उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 16 गुणासह अव्वल स्थान कायम असणार आहे. म्हणजेच भारताची उपांत्य फेरीत लढत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला तर क्रीडाप्रेमींना उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.
पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचणार?
- उपांत्य फेरीच्या दोन स्थानासाठी चार संघांमध्ये चुरस आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला अजून दोन सामने खेळायचे आहेत. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा साखळी फेरीतील प्रत्येकी एक सामना उरला आहे. ऑस्ट्रेलिया 10 गुण आणि +0.924 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 8 गुण आणि +0.398 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, पाकिस्तान 8 गुण आणि +0.36 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर, तर अफगाणिस्तान 8 गुण आणि -0.330 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे.
- पाकिस्तानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना पाकिस्तानला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे दोन गुणांची भर पडेल. म्हणजेच पाकिस्तानचे 10 गुण होतील. पण काहीही करून मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. नेट रनरेटमध्ये फरक पडून चौथं स्थान गाठणं सोपं होईल.
- पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित ऑस्ट्रेलियावरही अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाचे उर्वरित दोन सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेशसोबत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केलं तर उपांत्य फेरीच्या आशा वाढतील. पण अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा होईल.
- अफगाणिस्तानचा शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेशी आहे. या सामन्यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया सोडलं तर चौथ्या स्थानाच्या शर्यतील पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहे. दक्षिण अफ्रिकेने तर उपांत्य फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीचा सामना
भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्यामुळे पाकिस्ताननं उपांत्य फेरीच्या गणितात बाजी मारली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पुन्हा पाहता येणार आहे. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. तसेच वनडे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात विजय मिळवला आहे.