WPL 2023, DC vs MI | दिल्लीचा विजयरथ रोखला, मुंबई इंडियन्स टीमची विजयी हॅट्रिक
WPL 2023, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करत वूमन्स प्रीमिअर लीगमधील सलग तिसरा विजय ठरला आहे.
नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपली बादशाहत दाखवून दिली आहे. सलग 2 सामने जिंकणाऱ्या दिल्लीला 8 विकेट्सने पराभूत करत मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 106 धावांचं आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईच्या ‘पलटण’ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स या स्पर्धेत सलग 3 सामने जिंकणारी पहिल टीम ठरली आहे.
मुंबईकडून यास्तिका भाटीया हीने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. यात तिने 8 चौकार ठोकले. त्यानंतर हॅली मॅथ्यूजने 32 रन्सचं योगदान दिलं. नॅट सायव्हर-ब्रंट आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघांनी मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघींनी अनुक्रमे नाबाद 23 आणि 11 धावांची खेळी केली. दिल्लीकडून अॅलिस कॅप्सी आणि तारा नॉरिस या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्लीची बॅटिंग
त्याआधी दिल्लीने 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 105 धावा केल्या. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर कॅप्टन मेग लॅनिंग हीचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला फार वेळ मैदानात थांबता आलं नाही. मेगने पहिल्या 2 सामन्यात बॅक टु बॅक फिफ्टी मारली होती. तर या सामन्यात मेगने दिल्लीकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे दिल्लीला मुंबईसमोर 100 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देता आलं. तर मुंबईकडून साईका इशाक, हॅली मॅथ्यूज आणि इस्सी वोंग या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने धक्के देणं सुरुच ठेवलं. त्यामुळे दिल्लाच्या एकाही जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही . मेगचा अपवाद वगळता दिल्लीकडून जेमिमाह रॉड्रिग्स हीने 25 आणि राधा यादव हीने 10 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
चांगल्या फॉर्मात असलेली शफाली वर्मा हीने निराशा केली. शफालीला साईका इशाकने 2 धावांवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अॅलिस कॅप्सी 6 रन्स करुन माघारी परतली. मारिझान कॅप हीने 2 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जेस जोनासेन हीने 2 धावा केल्या. तानिया भाटीया 4 धावांवर आऊट झाली. मिन्नू मणी आणि तारा नॉरी या दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर शिखा पांडे 4 धावांवर नाबाद राहिली.
पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड आणि आता विजयी हॅट्रिक
मुंबईने याआधी मोसमाच्या आणि आपल्या सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 143 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह मुंबई वूमन्स टी 20 क्रिकेटमध्ये मोठ्या फरकाने जिंकणारी टीम ठरली. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना हा आरसीबी विरुद्ध झाला. मुंबईने या मॅचमध्ये आरसीबीचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला होता. तर आता दिल्ली विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला.
मुंबईच्या गोलंदाजांची दहशत
विशेष आणि अभिमानास्पद बाब अशी की मुंबई विरुद्ध आतापर्यंत या स्पर्धेत गुजरात, त्यानंतर आरसीबी आणि आता दिल्ली कॅपिट्ल्स या तिन्ही टीमना पूर्ण 20 ओव्हर खेळता आलेलं नाही. यावरुन मुंबईची गोलंदाजी किती धारधार आहे, याचा अंदाज येतो.
दरम्यान मुंबईचा मोसमातील चौथा सामना हा 12 मार्च रोजी यूपी विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून मुंबईची क्वालिफायमध्ये धडक मारण्याकडे लक्ष असणार आहे.