WPL 2024, DC vs GG : दिल्लीला अव्वल स्थान राखण्याचं आव्हान, गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून निवडली फलंदाजी
वुमन्स प्रीमियर लीग साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. हा औपचारिक सामना असून गुजरातचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर दिल्लीला अव्वल स्थान कायम ठेवायचं आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. स्पर्धेतील टॉप 3 संघांची निवड झाली असून हा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यात दिल्लीला फक्त आपलं अव्वल स्थान कायम ठेवायचं आहे. कारण अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत खेळणार आहे. जर गुजरात जायंट्सने दिल्लीला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर मात्र मुंबईला थेट अंतिम फेरीचं तिकिट मिळेल. त्यामुळे या सामन्यातील निकाल अव्वल स्थानाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स, दिल्ली कपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांनी टॉप थ्रीमध्ये एन्ट्री मारली आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास थेट अंतिम फेरी गाठेल. तर बाद फेरीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांची लढत होणार आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा गुजरातच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजी निवडली आहे.
गुजरातची कर्णधार बेथ मूनी म्हणाली, “आम्ही फलंदाजी करणार आहोत. मागील वेळेप्रमाणेच, ते आमच्यासाठी चांगलं असणार आहे. चांगली धावसंख्या उभारून त्या रोखणं सोपं जाईल. आम्ही या स्पर्धेत बरंच काही शिकलो आहोत.आम्ही स्पर्धा पुढे सरकत असताना काही सुधारणा केल्या आहेत. आम्ही अभिमानासाठी खेळणार आहोत, आमच्या संघात कोणताही बदल नाही.” दुसरीकडे, दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग म्हणाली की, “आम्हीही फलंदाजी केली असती. परंतु ही विकेट गोलंदाजीसाठी चांगली राहील. आम्ही हा खेळ इतर खेळांप्रमाणे घेऊ, मूलभूत गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या लागतील आणि परिणाम दिसेल. संघात एक बदल केला आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), दयालन हेमलथा, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम मो. शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी