WPL 2024, DCW vs GGT : दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, गुजरातचा 7 गडी राखून पराभव
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात दिल्लीने अंतिम फेरी गाठली आहे. साखळी फेरीत अव्वल स्थान कायम ठेवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीतल्या शेवटच्या सामन्यात गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला. आता दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी एका विजेत्याशी होईल.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने दुसऱ्यांदा धडक मारली आहे. मागच्या पर्वातही दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र मुंबई इंडियन्सने पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. साखळी फेरीतील अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं. आता अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यातील विजेत्याशी होईल. दरम्यान, गुजरात जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातला 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा करता आल्या. गुजरातने दिल्लीसमोर विजयासाठी 127 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दिल्लीने 3 गडी गमवून 14 व्या षटकात पूर्ण केलं. शफाली वर्माच्या झंझावाती अर्धशतकामुळे दिल्लीचा विजय सोपा झाला.
गुजरातची सुरुवात निराशाजनक राहीली. अवघ्या 16 धावांवर आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतले. वॉल्वॉर्ड, बेथ मूनी आणि हेमलथा स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फोइबे लिचफिल्ड आणि गार्डनरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण फोइबे 21 आणि गार्डनर 12 धावांवर तंबूत परतले. तर भारती फुलमालीने 36 चेंडूत 42 धावांची खेळी केली. ब्रायसने शेवटी येऊन 28 धावा जोडल्या. त्यामुळे 126 धावांपर्यंत मजल मारता आली.
गुजरातने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली. संघाच्या 31 धावा असताना मेग लॅनिंग धावचीत झाली. त्यानंतर एलिस कॅप्से शून्यावर तंबूत परतली. मात्र शफाली वर्माने आपला दांडपट्टा सुरुच ठेवा. 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. विजयासाठी अवघ्या चार धावा आवश्यक असताना तनुजा कंवरच्या गोलंदाजीवर शफाली बाद झाली. त्यानंतर जेमिमाने विजयी चौकार मारला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), दयालन हेमलथा, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम मो. शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.