WPL 2024, GG vs RCB : गुजरातच्या बेथ आणि लॉरा जोडीने अख्खा राग काढला, बंगळुरुच्या गोलंदाजांना धोपाटला
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातच्या बेथ मूनी आणि लॉरा वॉल्वार्ड्ट हीचा झंझावात पाहायला मिळाला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. बंगळुरुच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या 13 व्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने सामने आले आहेत. आतापर्यंत बंगळुरुत खेळल्या गेलेल्या चार सामन्यात गुजरातला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण दिल्लीचं हवामान गुजरातला मानवलं असंच म्हणावं लागेल. कारण गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकत आतापर्यंत चालत आलेल्या गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड मोडीत काढला. प्रथम फलंदाजी करत गुजरातने बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. मैदान चौकारांनी दणाणून निघालं होतं. तसेच बेथ मूनीने षटकार मारून प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. गुजरातने 20 षटकात 5 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं आहे. आता बंगळुरुचा संघ हे आव्हान गाठतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुजरातकडून कर्णधार बेथ मूनी आणि लॉरा वॉल्वार्ड्ट ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने बंगळुरुच्या गोलंदाजांचा घाम काढला. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 140 धावा केल्याय 13 षटकात 10.1 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. लॉरा वॉल्वार्ड्ट रनआऊट झाल्याने काही अंशी बंगळुरुला दिलासा मिळाला. पण तिथपर्यंत गुजरातने धावांचा डोंगर रचला होता. लॉरा वॉल्वार्ड्टने 45 चेंडूत 13 चौकाराच्या मदतीने 76 धावा केल्या. तर बेथ मुनीने 51 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. गुजरातने हा सामना जिंकला तर स्पर्धेत टॉप 3 साठीची चुरस आणखी वाढणार आहे.
गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन सामन्यात बंगळुरुने तर एका सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला पराभूत केलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, मेघना सिंग, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग