WPL 2024, GGT vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुजरातवर दणदणीत विजय, स्मृती मंधानाने फोड फोड फोडलं
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजराज जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात बंगळुरुने गुजरातवर सहज विजय मिळवला. गुजरातला 20 षटकात 107 धावांवर रोखलं आणि विजयासाठी मिळालेलं आव्हान सहज गाठलं.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसरा विजय मिळवला आहे. मागच्या पर्वात बंगळुरुची कामगिरी सुमार राहिली होती. पण यंदाच्या पर्वात चांगली सुरुवात केली आहे. पहिल्यांदा युपी वॉरियर्सला पराभूत केलं. त्यानंतर गुजरात जायंट्सचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत गुजरातला 107 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी मिळालेलं 108 धावांचं आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात स्मृती मंधानाचं वादळ पाहायला मिळालं. फलंदाजीसाठी आल्यानंतर आपलं आक्रमक रूप तिने दाखवलं. गुजरातच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
स्मृती मंधाना हीने 27 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यात 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. तनुजा कन्वरने स्वत:च्या गोलंदाजीवर तिचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. पण तिथपर्यंत तिने गोलंदाजांची पिसं काढली होती. सभिनेनी मेघना हीने नाबाद 36 आणि एलिसा पेरी हिने नाबाद 23 धावा केल्या.
बेथ मूनीने स्वस्तात बाद झाल्यानंतर फोइबे लिचफिल्डही काही खास करू शकली नाही. रेणुका सिंगने तिला तंबूचा रस्ता दाखवला. वेदा कृष्णमूर्तीनेही अपेक्षा भंग केला. दुसऱ्या सामन्यातही एकेरी धाव करून बाद झालीय. हरलीन देओल संघाला तारेल असं वाटतं होतं. पण 22 धावांवर रनआऊट झाली आणि धावांचं गणित फिस्कटलं. अशले गार्डनर काहीतरी खास करेल असं वाटलं होतं. पण तिचा डावही 7 धावांवर आटोपला. दयालान हेमलथाने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. या व्यतिरिक्त तळाचा एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. कॅथरीन ब्रायस 3, स्नेह राणा 12 धावा करून बाद झाले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग