WPL 2024, DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा अखेर वचपा काढला, टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा करेक्ट कार्यक्रम केला. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकूनही तसा काही फायदा झाला नाही. धावांचा पाठलाग करणं मुंबईला काही जमलं नाही.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील १२ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात रंगला. होम ग्राउंडमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा जलवा दिसला. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला मात्र दिल्लीने टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. मुंबईसमोर मोठं आव्हान ठेवायचं हे लक्ष्य होतं. त्यानुसार रणनिती आखली आणि केलंही तसंच..कर्णधार मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ४ गडी गमवून १९२ धावा केल्या आणि विजयासाठी १९३ धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ ७ गडी गमवून १६३ धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईवर २९ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्लीचा बाद फेरीत जाण्याचा प्रवास यामुळे सुखकर झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने धावांचा डोंगर रचल्याने मुंबईला आक्रमक सुरुवात करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आक्रमक खेळी करताना झटपट विकेट गमवल्या. हिली मॅथ्यूजने १६ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २९ धावा केल्या. या व्यतिरिक्त यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. यास्तिकाने ६, नॅट सायव्हर ब्रंटने ५ आणि हरमनप्रीत कौरने ६ धावा केल्या. एमिला केर आणि पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी १७ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिथपर्यंत धावांचं अंतर खूपच वाढलं होतं. अमनज्योत कौरने आक्रमकपणे २७ चेंडूत ४२ धावा केल्या. तर सजनाने १४ चेंडूत २४ धावा केल्या. मात्र तिथपर्यंत पराभव निश्चित झाला होता.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, सायका इशाक, शबनीम इस्माईल.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तीतास साधू, शिखा पांडे, राधा यादव.