WPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघाने या स्पर्धेत प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. तर या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. आता दिल्ली त्या पराभवाचा वचपा काढणार का? असा क्रीडाप्रेमींना प्रश्न आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील निकाल गुणतालिकेचं बरंचसं चित्र स्पष्ट करणार आहे. टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय महत्त्वाचा आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला होता. या सामन्यात दिल्लीने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. 1 चेंडूत 5 धावांची गरज असताना सजीवन सजनाने उत्तुंग षटकार ठोकला आणि दिल्लीच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. त्यामुळे आता कोण बाजी मारतं याची उत्सुकता लागून आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच दिल्लीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात आहे.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. या खेळपट्टीचा अनुभव नाही, म्हणून प्रथम गोलंदाजी करणे हा उत्तम पर्याय आहे. नवीन दिवस आहे आणि त्याची वाट पाहत आहे. दोन बदल असून मी आणि इस्माईल परत आली आहे. आम्ही उत्तम काम करत आहोत आणि आम्हाला पुढे चालू ठेवायचे आहे.”
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग यांनी सांगितलं की, “खेळण्यासाठी हे एक छान ठिकाण आहे. आमच्यासाठी फक्त एक बदल. कॅप्पीने ॲनाबेलची जागा घेतली आहे. आमच्याकडे कोणत्याही परिस्थिती हाताळण्यासाठी क्षमता आहे. आम्ही प्रत्येक गेममध्ये चांगले झालो आहोत, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे खेळाडू उभे राहिले आहेत, तरीही जिंकत राहणे महत्त्वाचे आहे”
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यात तीन सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. यात 2023 वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामनाही आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला मागच्या पर्वात एका सामन्यात यश मिळवता आलं आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, सायका इशाक, शबनीम इस्माईल.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तीतास साधू, शिखा पांडे, राधा यादव