WPL 2024, MI vs RCB : बाद फेरीत मुंबई आणि बंगळुरु आमनेसामने, कसा आहे रेकॉर्ड जाणून घ्या
वुमन्स लीग स्पर्धेचं दुसरं पर्व असून बाद फेरीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ आहेत. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. चला जाणून घेऊयात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कोण वरचढ ते
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या जेतेपदाबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर बाद फेरीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. 15 मार्चला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने तीन वेळा तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकदा विजय मिळवला आहे. पहिल्या पर्वात दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले होते. तर या पर्वात एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या पर्वातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 7 गडी आणि 29 चेंडू राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाचा वचपा काढला. 7 गडी आणि 30 चेंडू राखून मुंबईचा पराभव केला.
या स्पर्धेत तिसऱ्यांदा आणि बाद फेरीत पहिल्यांदा हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारणार आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हे दोन्ही सामने होणार आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
प्लेइंग इलेव्हन मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिना वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोबाना, रेणुका सिंग
लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. हा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. भारतीय दर्शकांना JioCinema ॲप आणि वेबसाइटवरही सामना थेट प्रक्षेपित केला जाईल.