Video : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत डीआरएसवरून वादाची ठिणगी, तुम्हीच सांगा आऊट आहे का ते
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यातील निकाल गुणतालिकेवर प्रभाव टाकत आहे. युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला. हा सामना बंगळुरुने जिंकला, पण डीआरएसवरून वादाला फोडणी मिळाली आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 23 धावांनी जिंकला. पण या सामन्यातील एका निर्णयामुळे वादाची फोडणी मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा केल्या आणि विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं आहे. युपीचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 175 धावा करू शकला. युपीसाठी एलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या चार षटकात 10 च्या सरासरीने धावगती सुरु होती. पण पाचव्या षटकात किरण नवगिरे बाद झाली धावगती घसरली. तिची जागा घेण्यासाठी चमिरा अथापट्टू आली होती. एलिसा हिली आणि चमिराची जोडी जमणार तितक्या एका निर्णयामुळे ही जोडी तुटली. सातवं षटक टाकणाऱ्या जॉर्जिया वारेहमच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. पण फिल्डवरील पंचांनी तिला नाबाद दिल्याने बंगळुरुने डीआरएस घेतला.
वारेहमच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट्स घेतला अथापट्टू बीट झाली आणि चेंडू पायावर आदळला. पंचांकडे जोरदार अपील करण्यात आली पण त्यांनी नकार दिला. स्मृती मंधानाने लगेचच डीआरएस घेतला. बॉल ट्रॅकिंगमध्ये निश्चित झालं की चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाही. हॉकआयवर दिसलं की चेंडू पायवर आदळला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळत आहे. पण वारेहम लेग स्पिनर असताना चेंडू ऑफब्रेक होत स्टंपवर आदळताना दिसला. त्यामुळे अथापट्टू आणि हीली दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
This is a leg-spin delivery. The ball pitches really close to the foot. Hawkeye’s projection takes it as a straight ball/googly…shows hitting the middle stump. Would love to hear Hawkeye’s explanation for this. Do more errors happen when the ball is pitching really close to the… pic.twitter.com/BqVdekd3k0
— Aakash Chopra (@cricketaakash) March 5, 2024
आकाश चोप्राने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, ‘हा एक लेग स्पिन होता. चेंडू पायाजवळ आदळला. हॉकआय असा चेंडू सरळ किंवा गुगली असल्याचं गृहीत धरतो. त्यामुळे मिडल स्टंपला हिट झाल्याचं दिसलं. मी हॉकआयकडून उत्तर घेऊ इच्छितो की, चेंडू जेव्हा पॅडच्या जवळ पडतो तेव्हा जास्त चुका होतात का? लक्षात टेवा रूटचा एलबीडब्ल्यूही हाफ वॉली होता.’
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने डीआरएस सिस्टम आणखी पारदर्शक करण्यासाठी हॉकआय ऑपरेटर्सवर कॅमेरा लावण्यास सांगितलं होतं. या माध्यमातून त्याने हॉकआयचे जनक पॉल हॉकिन्सवर निशाणा साधला होता. डीआर ऑपरेटर वॅनच्या आत क्वालिटी कंट्रोलसाठी कॅमेरे असतात.