WPL Final : विराट कोहलीला जे जमलं नाही ते स्मृती मंधानाने करून दाखवलं, मिळवून दिलं पहिलं जेतेपद
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे. आरसीबी फ्रेंचायसी गेली 16 वर्षे जेतेपदासाठी आतुरलेली होती. अखेर स्मृती मंधानाने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं जेतेपद मिळवून आरसीबीच्या चाहत्यांना गोड भेट दिली आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलंजर्स बंगळुरु चॅम्पियन ठरली. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला असला तरी सामन्यावर संपूर्ण पकड ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवली. दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली होती. पण मोलिनेक्सने आठव्या षटकात तीन गडी बाद करत दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकललं. दिल्ली कॅपिटल्स संघ 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर अवघ्या 114 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज गाठलं. सोफी डिव्हाईन आणि स्मृती मंधाना या जोडीने सावध सुरुवात करून दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून श्रेयंका पाटील, सोफी मोलिनेक्स आणि आशा सोभना यांनी कमाल केली. श्रेयंका पाटीलने 3.3 षटकात 12 धावा देत 4 गडी बाद केले. सोफी मोलिनेक्सने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. तर आशा सोभनाने 3 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले.
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या पदरात सलग दुसऱ्यांदा पराभव पडला आहे. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा पराभत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायसीला 16 वर्षानंतर स्पर्धेत जेतेपद मिळालं आहे. आयपीएलमध्ये अजूनही फ्रेंचायसीची झोळी रिती आहे. पण वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं आहे.
स्मृती मंधानाने टी20 च्या तुलनेत सर्वात धीमी फलंदाजी केली. 39 चेंडूत 31 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेस्ट 79.49 इतका राहीला. जेव्हा फटकेबाजी करून झटपट धावा करण्याची वेळ होती तेव्हा डॉट बॉलने प्रेशर वाढवलं. 15 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रेशर कमी करण्यासाठी स्मृतीने मिन्नू मनीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. मात्र अरुंधती रेड्डीने जराही चूक न करता झेल पकडला. यामुळे अंतिम क्षणी प्रेशर आणखी वाढलं. एलिस पेरीने शेवटपर्यंत तग धरला आणि शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सोफी डिव्हाईने 27 चेंडूत 25 धावा केल्या. तर एलिस पेरी नाबाद 34 आणि रिचा घोषने नाबाद 17 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.