IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा
Retirement : टीम इंडियाला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात 3 किवां त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलं.त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीय क्रिकेट वर्तुळातून फार मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील व्हाईटवॉशनंतर टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवशी पराभूत केलं आणि 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. या पराभवानंतर या अनुभवी खेळाडूने निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन निवृ्तीची माहिती दिली. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाचा हा माझा अखेरचा हंगाम असेल, असं साहाने म्हटलंय. “क्रिकेटमधील अविस्मरणीय प्रवासानंतर, हा माझा अखेरचा हंगाम असणार आहे. निवृत्त होण्याआधी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालचं शेवटच्या वेळेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं हा माझा गौरव आहे. हा हंगाम अविस्मरणीय करूयात”, असं साहाने म्हटलंय.
ऋद्धीमान साहा याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ऋद्धीमान साहा याने भारताचं 9 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. साहाने 9 सामन्यांमध्ये 41 धावा केल्या आहेत. तर 40 कसोटी सामन्यांमधील 56 डावात 29.41 च्या सरासरीसह 3 शतकं आणि 6 अर्धशतकांसह 1 हजार 353 धावा केल्या आहेत. साहाने अखेरचा कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर 2021 मध्ये खेळला होता. मात्र साहाचा हाच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
ऋद्धीमान साहाकडून निवृत्ती जाहीर
After a cherished journey in cricket, this season will be my last. I’m honored to represent Bengal one final time, playing only in the Ranji Trophy before I retire. Let’s make this season one to remember! pic.twitter.com/sGElgZuqfP
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) November 3, 2024
ऋद्धीमान साहा याची आयपीएल कारकीर्द
तसेच ऋद्धीमान साहा आयपीएलमध्ये 170 सामने खेळला आहे. साहाने आयपीएलमध्ये एकूण 5 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. साहाने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. साहाने या 170 सामन्यांमधील 145 डावांमध्ये 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 2 हजार 934 धावा केल्या आहेत.