WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानकडून भारतासाठी धोक्याची घंटा, एका विजयाने बदललं इतकं गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या साखळी फेरीला सुरुवात झाली आहे. कसोटीतील विजय आणि पराभवामुळे बराच फरक पडत आहे. आता पाकिस्तानच्या एका विजयाने भारताचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2023-2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून 9 संघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दोनदा पोहोचली. मात्र दोन्ही वेळेस टीम इंडियाच्या पदरी निराशाच आली आहे. आता टीम इंडिया पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारीला लागली आहे. भारताची पहिली कसोटी मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 141 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. मात्र आता पाकिस्तानच्या एका विजयाने बरंच गणित बदलल्याचं दिसत आहे.
पाकिस्तानच्या विजयाने बदललं गणित
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दोन कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेत पाकिस्तानने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने श्रीलंके विरुद्धचा पहिला कसोटी सामना 4 गडी राखून जिंकला. यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताशी बरोबरी साधली आहे.
भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने 12 गुण पदरी पडले आहेत. तर पॉइंट परसेंटेज सिस्टममध्ये 100 टक्के मिळाले आहे. अशीच काहीशी स्थिती पाकिस्तानची असून भारताशी बरोबरी साधत नंबर 1 स्थान गाठलं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणइ इंग्लंडचं गणित काहीसं वेगळं आहे. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया 22 गुण आणि पॉइंट परसेंटेज सिस्टममध्ये 61.11 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. एका पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचं एक नंबरचं गणित फिस्कटलं. तर इंग्लंडला एक विजय आणि दोन पराभवामुळे फक्त 10 गुण पदरी पडले आहेत. पॉइंट परसेंटेज सिस्टममध्ये 27.78 टक्के गुण पडले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने दोनदा एन्ट्री मारली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. तर नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी दारूण पराभव केला होता. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न दुसऱ्यांदा भंगलं होतं.