WTC 2023 Final IND vs AUS : सेहवाग स्टाईल बॅटिंग करण्यासाठी हा भारतीय खेळाडू सज्ज! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांमध्ये भीतीचं सावट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. 7 जून ते 11 जून दरम्यान हा सामना होणार आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने दुसऱ्यांदा धडक मारली आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडमुळे भारताचं स्वप्न भंगलं होतं. आता पुन्हा एकदा भारतीय संघ जेतेपदासाठी सज्ज आहे. तसेच दहा वर्षांपासून असलेला आयसीसी जेतेपदाचं दुष्काळ संपवण्याची संधी देखील आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला सहभागी करण्यात आलं आहे. जवळपास 18 महिन्यानंतर अजिंक्य रहाणेची भारतीय संघात वर्णी लागली आहे. या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेनं मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे धाबे दणाणले आहेत. कारण अजिंक्य रहाणेचा आक्रमक पवित्रा आयपीएल स्पर्धेत अनुभवायला मिळाला आहे. त्यामुळे त्याचा असाच अंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहायला मिळाला तर त्याला रोखणं कठीण असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
अजिंक्य रहाणेने सरावादरम्यान बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितलं की, “मी 18-19 महिन्यानंतर भारतीय संघात कमबॅक केलं आहे. जे काही चांगलं वाईट झालं त्याचा मी आता विचार करत नाही. मी आता नव्याने सुरुवात करू इच्छित आहे. मी आता जे काही केलं आहेत ते कायम ठेवू इच्छित आहे.”
आयपीएल 2023 स्पर्धेत अजिंक्य रहाणेचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाल. या स्पर्धेत त्याने एकूण 16 षटकार ठोकले. “मी वैयक्तिकरित्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना पूर्ण आनंद घेतला. मी पूर्ण सिझनमध्ये चांगली फलंदाजी केली. आयपीएलमध्ये माझी कामगिरी चांगली राहिली आहे. त्याबाबत मला आनंद वाटत आहे. त्यामुळे पुनरागमन माझ्यासाठी भावनात्मक आहे.” असं अजिंक्य रहाणेनं सांगितलं.
“मी त्याच मानसिकतेने फलंदाजी करू इच्छित आहे. मी आता फॉर्मेटबाबत विचार करत नाही. मग ती टी 20 असो की टेस्ट. मी आता जशी फलंदाजी करत आहे त्यात काही बदल करू इच्छित नाही. मी आहे तसंच ठेवण्याचा प्रयत्न करेल. तेच माझ्यासाठी चांगलं राहील.”, असं अजिंक्य रहाणे याने पुढे सांगितलं.
दोन्ही संघाचे खेळाडू
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट. राखीव: सूर्यकुमार यादव, यशवी जैस्वाल आणि मुकेश कुमार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श , टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.