WTC 2023 Final : अंतिम सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला कानमंत्र, या दोन खेळाडूंना घेण्याचा सल्ला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र ओव्हल मैदानातील खेळपट्टी कशी असेल याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान द्यायचं याबाबत डोकेदुखी वाढली आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची भारतीय संघाला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. कसोटीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. दोन वर्षाच्या जय पराजयाच्या गणितानंतर संघाला अंतिम फेरीत स्थान मिळतं. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ समोर आहे. त्यामुळे विजय वाटतो तितका सोपा नसेल हे देखील खरं आहे. इंग्लंडचं वातावरण आणि भारतीय खेळाडू वातावरणात तग धरून खेळणं हे मोठं आव्हान आहे. एकंदरीत हा सर्व अंदाज आणि खेळपट्टीचं आकलनं करून माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत सूचना केली आहे.
टीम इंडियाच्या ताफ्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याच सचिन तेंडुलकरने फिरकीपटूंचा टीम इंडियाला फायदा होईल, असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केलं आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन्ही खेळाडू चांगली फलंदाजीही करतात. त्यामुळे टीम इंडियाला मदत होईल.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
“भारतीय संघ ओव्हलवर खेळत असल्याचा आनंद आहे. ओव्हलच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता सामना सुरू असताना फिरकीपटूंना मदत होते. त्यामुळे, फिरकीपटूंचा संघाला फायदा होऊ शकतो. खेळपट्टी वळण देणारी असेलच असं नाही. कित्येकवेळी उसळीवरही अवलंबून असतं. थोड्याशा झिपवरही बरंच काही होऊ शकतं. चेंडूची चमकदार बाजू बरंच काही ठरवू शकते.” असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ
WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.