WTC 2023 Final Ind vs Aus : ओव्हल मैदानावर कोणाचं पारडं जड ? भारत आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड काय सांगतोय? वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? तसेच ओव्हल मैदान दोन्ही संघांसाठी कसं आहे? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. चला जाणून घेऊयात याबाबत
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. 7 जूनपासून सुरु होणाऱ्या या सामन्यात कोणाचं पारडं जड असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार असून या मैदानात दोन्ही संघांचा रेकॉर्ड बरंच काही सांगून जातो. त्यामुळे दोन्ही संघांसाठी विजय वाटतो तितका सोपा नसेल. भारताने या मैदानात एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय, 5 सामन्यात पराभव आणि 7 सामने अनिर्णित ठरले आहेत. टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी म्हणजे या मैदानात शेवटचा सामना जिंकला होता. सप्टेंबर 2021 मध्ये खेळलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंडला 157 धावांनी पराभूत केलं होतं. या सामन्यात रोहित शर्माने 127 धावांची खेळी केली होती आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही या मैदानात काही खास नाही. एकूण 34 सामने या मैदानात खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय, 17 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. या दोन्ही संघांमध्ये एकूण 106 सामने झाले आहेत. यापैकी 44 सामन्यात ऑस्ट्रेलिय आणि 32 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 29 सामने ड्रॉ आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.
गेल्या दहा वर्षात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताने 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत इंग्लंडला मात दिली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.
टीम इंडियाला 2014 मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पराभव, वनडे वर्ल्डकप 2015 आणि टी 20 वर्ल्डकप 2016 च्या उपांत्य फेरीत पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी 2017, वर्ल्ड कप 2019 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हार पत्कारावी लागली होती. त्यानंतर 2021 आणि 2022 टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक होती.
दोन्ही संघांची संपूर्ण स्क्वॉड
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.