लंडन | आयपीएल 16 व्या मोसमातील महाअंतिम सामन्याचं आयोजन हे पावसामुळे राखीव दिवशी करण्यात आलं. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात महाअंतिम सामना हा 28 मे रोजी होणार होता. मात्र 4 तास प्रतिक्षा केल्यानंतरही पाऊस थांबला नाही. त्यामुळे सामना राखीव दिवशी होणार असल्याचं ठरलं. या आयपीएल फायलनंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागून राहिलंय. हा महामुकाबला लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा खबरदारी म्हणून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे खेळ होऊ न शकल्यास उर्वरित खेळ राखीव दिवशी खेळवण्यात येईल.
आयसीसी क्रिकेट महाप्रबंधक वसीम खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी महत्वाची बाब सांगितली. आम्ही स्थानिक अर्थात इंग्लंड क्रिकेट समितीसह मिळून काम करतोय, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना चाहत्यांसाठी अविस्मरणीय होईल. क्रिकेट स्टेडियम किमान पहिले 4 दिवस खचाखच भरलेलं राहिल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही योग्य दिशेने जातोय”, असं खान म्हणाले.
“जगातील 2 सर्वोत्तम संघ आमनेसामने असतील. यामुळेच क्रिकेट चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. हा सामना शानदार होईल. या सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहिल, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 5 दिवस सामन्याची मजा घेता येईल. मात्र आम्ही खबरदारी म्हणून एक राखीव दिलस ठेवला आहे”, असं खान यांनी स्पष्ट के लं.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.