WTC 2025 : भारताने कसोटीत विजय मिळवताच गुणतालिकेत उलथापालथ, फायनलसाठी आता असं समीकरण
पर्थ कसोटीत भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने कांगारुंना त्यांच्याच धरतीत 295 धावांनी धोबीपछाड दिला आहे. खरं तर याचं संपूर्ण श्रेय हे गोलंदाजांना जातं. कारण पहिल्या डावात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे मनोबल वाढलं आणि विजय सोपा झाला. या विजयासह वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण 150 धावांवरच ऑलआऊट झाल्याने क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या होत्या. असं असताना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाला 104 धावांवरच रोखलं. तर दुसऱ्या डावात फलंदाजांचं मनोबल वाढलं ते यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलच्या मोठ्या भागीदारीमुळे.. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीने शतक ठोकत धावांचा डोंगर रचला. दुसऱ्या डावात 487 धावा करत पहिल्या डावातील आघाडीसह 533 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाची पडझड झाली. ऑस्ट्रेलियाला 238 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेडने चिवट खेली केली. त्याचा काटा काढण्यात बुमराहला यश आलं. त्याने 101 चेंडूत 89 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर भारताचा विजय सोपा झाला. या विजयासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे.
भारताचे अजून चार सामने शिल्लक असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीस पात्र ठरेल. भारताने आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताची विजयी टक्केवारी ही 61.11 इतकी आहे. खरं भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी चांगली कामगिरी केली असती तर भारताचं पहिल्या विजयानंतर दावा पक्का झाला असता. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून 8 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 57.69 असून दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंका संघ आतापर्यंत 9 सामने खेळले असून 5 सामन्यात विजय 4 सामन्यात पराभव झाला आहे. विजयी टक्केवारी 55.56 इतकी असून तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाने 11 कसोटी सामने खेळले असून 6 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभव सहन केला आहे. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 54.55 टक्के आहे. तर दक्षिण अफ्रिका संघ 8 सामने खेळले असून 4 सामन्यात विजयी, 3 सामन्यात पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे. विजयी टक्केवारी 54.17 इतका आहे. या व्यतिरिक्ता इंग्लंड, पाकिस्तान, बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ अंतिम फेरीच्या रेसमधून बाद झाले आहेत.