लंडन | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयपीएल 16 व्या सिजननंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हल या मैदानात पार पडणार आहे. टीम इंडियाला 2013 नंतर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे यंदा या सामन्यात बाजी मारून टीम इंडिया इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याचीही कसोटी लागणार आहे. चॅम्पियन होण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेस्ट प्लेइंग इलेव्हनसोबत खेळावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या हायव्होल्टेज सामन्यात रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंग करु शकतो. या दोघांनी आतापर्यंत टीम इंडियासाठी अनेकदा ओपनिंग केली आहे. दोघांमध्ये ट्युनिंगही चांगली आहे. त्यामुळे ही जोडी ओपनिंग जोडी म्हणून नक्की समजली जात आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजारा खेळायला येऊ शकतो. चौथ्या स्थानी विराट कोहली उतरेल. अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजासाठी येऊ शकतो. अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय.तसेच रहाणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. रहाणेने 2014, 2018 आणि 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खोऱ्याने धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर पुजारा, विराटसोबत मिडल ऑर्डरची धुरा असणार आहे.
त्यानंतर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर येतात ते ऑलराउंडर. इथे रविंद्र जडेजा याला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. जडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. तर कॅप्टन रोहित विकेटकीपर इशान किशन याला सातव्या क्रमांकावर पाठवू शकतो. म्हणजेच काय तर केएस भरत याला रोहित डच्चू देणार असल्याचं समजलं जात आहे. केएस भरत सध्या फ्लॉप कामगिरी करतोय. तसेच त्याची विकेटकीपिंगही खास नसल्याचं म्हटलं जातं.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आर अश्विन याच्या एकट्याचाच फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करु शकतो. ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल समजली जाते. त्यामुळे अश्विन आणि जडेजा हे दोघे कांगारुंसाठी डोकेदुखी ठरु शकतात.
मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या तिघांना वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. त्यामुळे उमरान मलिक, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट या तिघांना डच्चू मिळू शकतो. अर्थात आता जयदेव उनाडकट आणि उमेश यादव या दोघांना दुखापत झाली आहे. त्यामुळे या दोघांबाबत निवड समितीने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.