IND vs AUS WTC Final Day 4: भारताला जेतेपद आणि इतिहास रचण्याची संधी, विराट-अजिंक्य जोडी कमाल करणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ दुसऱ्यांदा पोहोचला आहे. मात्र भारतीय संघ सध्या नाजूक स्थितीत आहेय 444 धावांचा पाठलाग करताना भारताने 3 गडी गमावले आहेत. आता 280 धावा आणि 7 गडी हातात आहेत.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने तीन गडी गमवून 164 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाच्या 41 धावा असताना शुभमन गिलला बाद देण्यात आलं. मात्र तो बाद होता की नाही याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे संघ अडचणीत असताना रोहित शर्माला कसलंही भान नव्हतं. लायनच्या गोलंदाजीवर स्विप फटका मारताना पायचीत झाला. त्याने 60 चेंडूत 43 धावा केल्या. त्यात संघाला चेतेश्वर पुजाराने तग धरावा अशी अपेक्षा असताना चुकीच्या फटका मारून हातात झेल देऊन बाद झाला. 47 चेंडूत त्याने 27 धावा केल्या.
भारताचे 3 गडी बाद झाले असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं संयमी फलंदाजी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 71 धावांची खेळी केली. आता या दोघांकडून आता मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. संघाला विजयासाठी अजून 280 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर ही धावसंख्या होण्यासारखी आहे. पण आत्मविश्वासाने खेळणं गरजेचं आहे.
चौथ्या दिवसअखेर विराट कोहलीने नाबाद 44 आणि अजिंक्य रहाणे नाबाद 20 धावा केल्या आहेत. दुसरीकडे भारताला फलंदाजीची अपेक्षा असलेल्या खेळाडूंमध्ये श्रीकर भरत, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर हे खेळाडू आहेत. तर उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शमी हे खेळतील अशी अपेक्षा नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने सर्वबाद 296 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 173 धावांची मजबूत आघाडी मिळाली. या धावांसह पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 270 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यासह भारताला विजयासाठी 444 धावांचं आव्हान मिळालं. आता भारताने चौथ्या दिवशी 3 गडी गमवून 164 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 280 धावांची आवश्यकता आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.