WTC Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा?
न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला होता. या विजयामुळे टीम इंडियाला मोठा फायदा झाला. न्यूझीलंडच्या या विजयामुळेच टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली
मुंबई | भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष फार महत्वाचं आहे. टीम इंडियाला 2013 नंतर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या वर्षी टीम इंडियाला एका नाही तर 2 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. भारतात वर्षाअखेर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.तर त्याआधी टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाचा या महामुकाबल्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार, याबाबतच मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी संघातील सदस्यांची नावं देण्याची 7 मे ही शेवटची तारीख आहे. शिवसुंदर दास यांच्या अध्यक्षेतखालील निवड समिती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. यासाठी निवड समितीची एप्रिलमध्ये बैठक होणार आहे.
“आमच्याकडे भारतीय संघ निवडण्यासाठी पर्याप्त वेळ आहे. खेळाडूंची नाव देण्याची 7 मे ही अंतिम तारीख आहे. आम्ही 22 मे पर्यंत त्यात फेरबदल करुन खेळाडूंची नाव देऊ शकतो. निवड समिती आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असेल. त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.
दरम्यान टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. टीम इंडिया याआधी 2021 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचली होती.मात्र तेव्हा टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. तेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.
मात्र यावेळेस टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात फायनल खेळायला उतरणार आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जिंकवलं तर, टीम इंडियाचा 10 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल. टीम इंडिया 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.
wtc final 2023 साठी संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (फिटनेसव अवलंबून ), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनादकट आणि उमेश यादव.