WTC फायनल मॅचची तारीख ठरली, जाणून घ्या केव्हा होणार महामुकाबला?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया याआधीच पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात टीम इंडियाचा आमनासामना करावा लागू शकतो.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होण्याची तीव्र शक्यता आहे. टीम ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचली आहे. तसेच टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र अंतिम फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडियाचा मार्ग सोपा नाही. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील किमान 3 सामने टीम इंडियाला जिंकावे लागतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना हा ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्याची तारीखही ठरली आहे.
टाईम्स ऑफ इंडियानुसार अंतिम सामना हा 8 जूनला खेळवण्यात येणार आहे. मात्र आयसीसीकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनुसार, अंतिम सामन्याचं आयोजन हे 8 ते 12 जूनदरम्यान करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे वेळ वाया गेला, तर त्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
आयपीएल आणि WTC फायनल
जर अंतिम सामन्याला 8 जूनपासून सुरुवात झाली, तर याचा अर्थ असा की आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यादरम्यान पर्याप्त अवधी आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सांगता मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होईल.
टीम इंडियाचं लक्षही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचं असेल. कारण गेल्या वेळेस टीम इंडियाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना 19 ते 23 जून दरम्यान खेळवण्यात आला होता.
टीम इंडियाचा आता त्या अंतिम सामन्यात झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागले. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइंट्सटेबलमध्ये 75.56 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडिया 58.93 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर श्रीलंका तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे.