WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील यशस्वी संघ कोणता? टीम इंडिया कितव्या स्थानी?
World Test Championship: कसोटी क्रिकेटला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी आणि चाहत्यांना इंटरेस्ट वाढवण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची सुरुवात केली. तेव्हापासून कसोटी सामने हे या स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात येत आहेत.
टी 20i आणि एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे कसोटी सामन्यांच्या थरार वाढवण्यासाठी आयसीसीने 2019 साली मोठा निर्णय घेतला. त्यानुसार आयसीसीने पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचं आयोजन केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सर्वाधिक कसोटी सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतर्गंत खेळवण्यात येतात. आतापर्यंत या स्पर्धेच्या 2 साखळींमधील अंतिम सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया दोन्ही वेळेस अंतिम फेरीत पोहचली. मात्र टीम इंडियाला दोन्ही वेळेस मानाची गदा जिंकण्यात अपयश आलं. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 2019 पासून ते आतापर्यंत यशस्वी संघ कोणता? हे आपण जाणून घेऊयात.
आतापर्यंत एकूण 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना झाला आहे. त्यात आधी न्यूझीलंड आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत गदेवर आपलं नाव कोरलं. मात्र सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियासह टीम इंडियाचा समावेश आहे. दोन्ही संघांनी समसमान असे सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत डब्ल्यूटीसी अंतर्गत एकूण 46 सामने खेळले आहेत. कांगारुंनी त्यापैकी 28 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत 2 सामने कमी खेळले आहेत. भारताने एकूण 46 पैकी 28 सामने जिंकले आहेत. भारताला 13 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर 5 सामने हे ड्रॉ झाले आहेत. टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल अर्थात पहिल्या स्थानी आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंडची कामगिरी
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियानंतर इंग्लंडने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. इंग्लंडने 2019 पासून एकूण 56 पैकी 27 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर तब्बल 21 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडच्या विजयाचा आकडा हा टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपास आहे. मात्र तुलनेत इंग्लंडने दोन्ही संघांपेक्षा अधिक सामने खेळले आहेत.त्यामुळे इंग्लंडला 27 सामन्यांचा फायदा रँकिंगमध्ये झालेला नाही.तर न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 31 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर इतर संघांची आपआपसातच चडाओढ पाहायला आहे.