Ranji Trophy ची सुरुवात शतकाने शेवट द्विशतकाने, यश धुलची बॅट तळपली तरिही दिल्ली स्पर्धेबाहेर
यश धुल (Yash Dhull)… हे नाव गेल्या दीड महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये खूप चर्चेत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात या नावाची दखल घेतली जाऊ लागली आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच 5 फेब्रुवारीला यश धुलने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद मिळवून दिले.
मुंबई : यश धुल (Yash Dhull)… हे नाव गेल्या दीड महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये खूप चर्चेत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात या नावाची दखल घेतली जाऊ लागली आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच 5 फेब्रुवारीला यश धुलने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद मिळवून दिले. दिल्ली क्रिकेट संघाच्या (Delhi Cricket Team) या फलंदाजाने आपल्या नेतृत्वगुणांनीच नव्हे तर आपल्या बॅटने चमकदार कामगिरी करून उज्ज्वल भविष्याची झलक दाखवली होती. विश्वचषक विजयानंतर पुढच्या एका महिन्याततच यश धुलने सिद्ध केलं आहे की, तो ‘लबी रेस का घोडा’ आहे. 19 वर्षीय फलंदाजाने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील (Ranji Trophy 2022) पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं. त्यानंतर स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात संस्मरणीय द्विशतक झळकावून सर्वांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या महा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या संघात घेतलं.
रणजी ट्रॉफी 2022 च्या मोसमात दिल्लीचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला आहे. त्यांच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये दिल्लीचा संघ छत्तीसगडला पराभूत करण्यात अपयशी ठरला आणि त्यामुळे गुणतालिकेत तळाशी राहिला. तथापि, जसजसा संघ प्रगती करत गेला, तसतसे एका उगवत्या ताऱ्याने पुढील हंगामासाठी आशा निर्माण केल्या आहेत. गुवाहाटी येथील एलिट ग्रुप-एच सामन्याच्या शेवटच्या दिवशी, रविवार, 6 मार्च रोजी, दिल्ली संघाने 2 बाद 396 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि यासह सामना अनिर्णित राहिला.
फॉलोऑननंतर शानदार द्विशतक
यश धुलने सामन्यातील शेवटचा चेंडू खेळला, ज्यावर या उजव्या हाताच्या फलंदाजाने एक धाव घेतली आणि संस्मरणीय डावाची सुंदर सांगता केली. या एका धावेसह धुलने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. याच मोसमात दिल्लीकडून पदार्पण करणारा धुल संघासाठी सलामी देत होता.
फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात दिल्लीच्या सलामीवीराने छत्तीसगडच्या गोलंदाजांची दमछाक करत आपले द्विशतक झळकावले. धुलने अवघ्या 261 चेंडूंत 26 चौकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या.
पहिल्या डावात संपूर्ण संघाप्रमाणे तोदेखील अपयशी ठरला होता, पण दुसऱ्या डावात त्याने सलामीचा जोडीदार ध्रुव शौरीच्या साथीने दमदार सुरुवात केली. शौरीने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. तो 100 धावा करून बाद झाला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारी केली.
इतर बातम्या