आयपीएलदरम्यान यशस्वी जयस्वालबाबत मोठी अपडेट; क्रिकेटरचा टीमची साथ सोडण्याचा निर्णय!
Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यशस्वीने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान एका मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

यशस्वी जयस्वाल अवघ्या काही काळात टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज म्हणून नावारुपास आला. यशस्वी काही वर्षांतच टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्यात यशस्वी ठरला. यशस्वी टीममध्ये असल्यास विजयाची शक्यता आणखी वाढते. यशस्वीने आतापर्यंत अनेकदा मॅचविनिंग खेळी केली आहे. यशस्वीने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. इतकंच नाही तर, यशस्वी टीम इंडियात आपलं स्थान कायम राखण्यातही यशस्वी ठरलाय. यशस्वी आयपीएलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. मात्र यशस्वीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“मला जाऊ द्या!”
मला टीममधून मुक्त करा, यशस्वीने अशी परवानगी मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वीला मुंबई टीमची साथ सोडायची आहे. यशस्वीने त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितली आहे. मुंबईची साथ सोडण्यामागे यशस्वीने वैयक्तिक कारण सांगितलं आहे. यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय.
यशस्वी कुणाचं प्रतिनिधित्व करणार?
रिपोर्ट्सनुसार, यशस्वीने मुंबईची साथ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वीला आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत गोव्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे. अर्जून तेंडुलकरने मुंबईची साथ सोडल्यानंतर तो सध्या गोव्याकडून खेळत आहे. अर्जून गेल्या 3 हंगामांपासून गोव्यासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. त्यानंतर आता यशस्वीलाही गोवा खुणावत आहे. तसेच यशस्वी गोवा संघाचा कर्णधार होऊ शकतो, असंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत चर्चाच सुरु आहेत. मात्र यशस्वीने एमसीएकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी अर्ज केल्याचं निश्चित म्हटलं जात आहे.मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
मुंबईसाठी 2019 साली डेब्यू
यशस्वीने 2019 साली मुंबईकडून पदार्पण केलं. यशस्वीने छत्तीसगडविरुद्ध पदार्पण केलं.तेव्हापासून यशस्वीने 36 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 60 पेक्षा अधिक सरासरीने 3 हजार 712 धावा केल्या आहेत. यशस्वीने या दरम्यान 13 शतकं आणि 12 अर्धशतकं झळकावली आहेत. मुंबईने यशस्वीला खेळण्याची संधी दिली. मुंबई टीम मॅनजमेंटने यशस्वीला सहकार्य केलं. यशस्वीनेही त्या संधीचं सोनं केलं आणि नावारुपास आला. मात्र आता यशस्वी मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
यशस्वी 18 व्या मोसमात ढेर
दरम्यान यशस्वी जयस्वाल आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत बॅटिंगने निष्प्रभ ठरला आहे. राजस्थानसाठी खेळणाऱ्या यशस्वीला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. यशस्वीला हैदराबादविरुद्ध फक्त 1 धावच करता आली. यशस्वी केकेआरविरुद्ध 29 धावा करुन आऊट झाला. तर चेन्नईविरुद्ध फक्त 4 धावा करुन माघारी परतला.