Yashasvi Jaiswal चा आणखी एक कारनामा, जिंकला आयसीसीचा मोठा पुरस्कार
Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल या टीम इंडियाच्या युवा फलंदाजाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका गाजवली. यशस्वीच्या या कामगिरीची दखल घेत आयसीसीने त्याचा मोठा सन्मान केला आहे.
मुंबई | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका ही 4-1 ने जिंकली. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकवण्यात टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. यशस्वी जयस्वाल याने यात खारीचा वाटा उचलला. यशस्वी जयस्वाल याने 2 द्विशतकांसह एकूण 5 सामन्यांमधील 9 डावांमध्ये विक्रमी 712 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल याला या कामगिरीचं आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बक्षिस मिळालं आहे. आयसीसीने यशस्वीचा मोठा सन्मान केला आहे.
आयसीसीने टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जयस्वाल याला फेब्रुवारी महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यशस्वीने दोघांना मागे टाकत बाजी मारली आहे. आयसीसीने या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियमसन आणि श्रीलंकेच्या पाथुम निसांका या दोघांनाही नामांकन दिलं होतं. मात्र यशस्वीने या दोघांना धोबीपछाड देत हा पुरस्कार मिळवला आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स क्रिकेट टीमची ऑलराउंडर अन्नाबेल सदरलँड हीने ‘वूमन्स प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला. एका महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना आयसीसीकडून या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात येतं. त्यानंतर काही दिवसांनी विजयी खेळाडूचं नाव जाहीर केलं जातं.
यशस्वी जयस्वालचा आयसीसीकडून मोठा सन्मान
India’s breakout performer takes home the ICC Men’s Player of the Month award after a stellar February 🏅
More 👇
— ICC (@ICC) March 12, 2024
इंग्लंड विरुद्ध धावांचा डोंगर
यशस्वीने फेब्रुवारी महिन्यात 112 च्या सरासरीने 560 धावा कुटल्या. टीम इंडियाला हैदराबादमध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत विजयी चौकार लगावला आणि मालिका 4-1 ने जिंकली. यशस्वीने या मालिकेदरम्यान सलग 2 द्विशतकं झळकावली. यशस्वीने विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात 209 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटमध्ये 214 धावा ठोकल्या.
यशस्वी जयस्वालची पहिली प्रतिक्रिया
“मी फार खूप आनंदी आहे. भविष्यात पुन्हा अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिकेचा अनुभव माझ्यासाठी फार चांगला राहिला”, अशी प्रतिक्रिया यशस्वीने दिली.