मुंबई (दिनेश दुखंडे) : खेळामुळे माणसं जवळ येतात. नाती जोडली जातात. दोन देशात शत्रुत्वाची भावना असेल, तर खेळ त्यावर उत्तम औषध आहे. भारत-पाकिस्तान राजकीय संबंधांबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशात राजकीय संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा वापर केला गेलाय. खेळामुळे दुंभगलेली मन जोडली जातात. म्हणून जीवनात एखाद्या तरी खेळाची तुम्हाला आवड असली पाहिजे. भारतात क्रिकेट हा खेळ नाहीय, धर्म आहे. सध्या संपूर्ण देश क्रिकेटमय झाला आहे. कारण आपली टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. सर्वांना उत्सुक्ता आहे ती, भारत-ऑस्ट्रेलिया फायनलची. येत्या 19 नोव्हेंबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी फायनल पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत.
या फायनलआधी 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलचा सामना झाला. भारत-न्यूझीलंडमधील हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियम फुल पॅक होतं. मुंबईत सामना म्हटल्यावर बॉलिवूड, सेलिब्रिटी आणि राजकरणी यांची हजेरी असण स्वाभाविक आहे, त्यात ही तर वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच होती. त्यामुळे मुंबईतील अनेक दिग्गज हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर झाडून हजर होते. यात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते सुद्धा होते.
हे सर्वपक्षीय चित्र तुम्हाला फक्त वानखेडेवर दिसेल
याच सामन्यात वानखेडे स्टेडियमवर एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्रातले युवा राजकारणी एकत्र आले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. आपआपले राजकिय पक्ष काही काळासाठी बाजूला ठेवत महाराष्ट्रातील या युवा राजकारण्यांनी परवा भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सेमीफायनलमधील सामन्याचा आनंद लुटला. योगेश कदम, झिशान सिद्धिकी, अदिती तटकरे आणि क्षितिज ठाकूर या सामन्याला हजर होते. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. झिशान सिद्धिकी हे काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांचे पुत्र आहेत. असं हे सर्वपक्षीय चित्र तुम्हाला फक्त वानखेडे स्टेडियमवरच दिसू शकतं.