विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी मैदानात उतरला युवराज सिंग, म्हणाला…
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 3-1 ने गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टीकेची धनी ठरले आहे. त्यांच्यावर क्रीडाप्रेमींची नाराजी दिसून येत आहे. अशा स्थितीत माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज त्यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आला आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका गमावण्यासोबत टीम इंडियाच वर्ल्ड टेस्ट अंतिम फेरीचं स्वप्नही भंगलं आहे. भारताने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत शेवटचा सामना जिंकला असता तर कदाचित आशा अजून जिवंत असत्या. मात्र पराभवानंतर सर्वच गणित कोलमडून गेलं आहे. भारताची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सुमार कामगिरी राहिली आहे. खासकरून न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने गमावली तिथेच सर्वकाही संपलं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटत होतं. पण पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर गाडी रुळावरून घसरली. खासकरून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला. रोहित शर्माच्या बॅटमधून धावाच आल्या नाहीत. तर विराट कोहली वारंवार विचित्र पद्धतीने बाद होत राहिला. त्यामुळे दोन्ही खेळाडू टीकेचे धनी ठरले आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग या दोन्ही खेळाडूंच्या मदतीला पुढे आला आहे. तसेच त्यांची पाठराखण केली आहे.
सिक्सर किंग युवराज सिंगने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे कर्तव्य आहे की, मी त्यांना कुटुंब आणि एक भाऊ म्हणून पाठिंबा द्यावा. ते नक्कीच या संकटावर मात करून पुन्हा जोमाने खेळतील.’ तसेच या दोन्ही खेळाडूंची स्तुती करताना पुढे सांगितलं की, ‘विराट कोहली आणि युवराज सिंह हे दोन्ही मोठे क्रिकेटपटू आहेत. आपण आपल्या दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल वाईट बोलणं योग्य नाही. त्यांनी भुतकाळात जे काही केलं आहे ते विसरून कसं चालेल. क्रिकेटपटूंवर टीका करणं सोपं आहे. आपल्याला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की नक्कीच ते चांगलं करतील.’
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं असलं तरी टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. यासाठी 12 जानेवारीला संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार यात काही शंका नाही. तर विराट कोहलीही या संघात असणार आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना वनडे फॉर्मेटमध्ये असलेल्या या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.