IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज, नंबर 1 कोण?
Most Wickets In Ipl History : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 जणांमध्ये 3 फिरकीपटू आहेत. तर दोघे वेगवान गोलंदाज आहेत. जाणून घ्या पहिल्या स्थानी कोण आहे?

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं (IPL 2025) काउंटडाऊन सुरु झालं आहे. यंदा या स्पर्धेतील 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील सलामीच्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध गतविजेता कोलकाता आमनेसामने असणार आहेत. यंदाच्या हंगामाआधी मेगा ऑक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निवडक खेळाडू सोडले तर प्रत्येक संघात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे या हंगामात क्रिकेट चाहत्यांना खेळाडू नव्या जर्सीत खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे आणखी चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात पंजाब किंग्सच्या हर्षल पटेल याने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हर्षलने 14 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. या 18 व्या हंगामानिमित्ताने आपण या स्पर्धेतील इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
युझवेंद्र चहल
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा युझवेंद्र चहल याच्या नावावर आहे. चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर आतापर्यंत 160 सामन्यांमध्ये 205 विकेट्स घेतल्या आहेत. चहल आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे. तसेच चहल आता या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. चहलने याआधी राजस्थान, बंगळुरु आणि मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे.
पीयूष चावला
पीयूष चावला अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. चावलाने आयपीएलमध्ये चेन्नई, कोलकाता, पंजाब आणि मुंबइचं प्रतिनिधित्व केलं आहे. चावलाने 192 सामन्यांमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहेत. चावलाची 17 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चावला या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
ड्वेन ब्राव्हो
विंडीजचा माजी ऑलराउंडर ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधूनही निवृत्त झाला आहे. मात्र त्यानंतरही ड्वेन सर्वाधिक विके्टस घेण्याबाबत तिसऱ्या स्थानी आहे. ड्वेनने 161 सामन्यांमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत.
भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार याने आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळताना आतापर्यंत एकूण 176 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. भुवनेश्वरने या दरम्यान 181 विकेट्स घेतल्यात. भुवीची 19 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोच्च कामगिरी आहे. भुवी यंदा बंगळुरुकडून खेळणार आहे.
सुनील नरेन
कोलकाताचा स्टार ऑलराउंडर सुनील नरेन याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 177 सामने खेळले आहेत. सुनीलने या सामन्यांमध्ये 180 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. सुनीलनेही 19 धावा देत 5 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.