भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या टीम इंडियाबाहेर आहे. संघात कमबॅक करण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. असं असताना त्याला आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सकडून धक्का बसला आहे. कारण त्याला रिटेन केलं नाही. त्यामुळे युझवेंद्र चहल मेगा लिलावात दिसणार आहे. त्याला संघात घेण्यासाठी कोण बोली लावणार? याची चर्चा सुरु आहे. असं असताना युझवेंद्र चहलची एक पोस्ट चर्चेत आली आहे. युझवेंद्र चहलसोबत राजस्थान रॉयल्सने जोस बटलरलाही रिलीज केलं आहे. फ्रेंचायझीत एकत्र असताना या दोघांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं होतं. जोस बटलर 2018 पासून फ्रेंचायझीसोबत आहे. तर 2022 मध्ये युझवेंद्र चहल फ्रेंचायझीसोबत जोडला गेला होता. सोशल मीडियावर युझवेंद्र चहलने बटलरसोबतची एकप अपलोड केली आहे. त्याने जोस बटलरचा उल्लेख ‘जोस भाई’ करत त्याचे आभार मानले आहेत. “2022 मध्ये मी त्याला जोस बटलर म्हणून ओळखत होतो. 2024 मध्ये, तो माझा जोस भाई झाला,” चहलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
“तुझ्या आजूबाजूला दररोज राहण्यात एक वेगळीच मजा आहे. तू माझ्यासाठी काय केलेस हे फक्त काही लोकांनाच माहीत आहे. नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद. आशा आहे की, संध्याकाळी 7.30 वाजता, आपण दोघे एकत्र फलंदाजीला सुरुवात करू,” असं युझवेंद्र चहलने पोस्टमध्ये लिहिलं आहे. युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसोबत येण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत होता. मात्र फ्रेंचायझीने त्याला रिलीज केलं. तेव्हा चहलने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
In 2022 I knew him as Jos Buttler. In 2024, he’s my Jos bhai. ❤️
Loved every day being around you and only a few people know what you’ve done for me. Thank you for always standing by me. And hopefully, on some evening at 7.30 PM, we both will open the batting together 😂💪 pic.twitter.com/C70Fxz5zq0
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) November 8, 2024
31 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन (18 कोटी), यशस्वी जयस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी) आणि संदीप शर्मा (4 कोटी) असं कायम ठेवलं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेसाठी राहुल द्रविड मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. राजस्थान रॉयल्सने 2008 या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 16 पर्वात जेतेपदासाठी फक्त झुंज दिली. 2022 साली ही संधी चालून आली होती. पण गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. यंदाच्या पर्वातही संजू सॅमसनकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.