Hat Trick | हॅटट्रिक घेत 22 वर्षाच्या गोलंदाजाचा कारनामा, टीमचा अवघ्या 1 धावांनी सनसनाटी विजय
प्रत्येक गोलंदाजाचं आपल्या कारकीर्दीत एकदातरी हॅट्रिक घेण्याचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न प्रत्यक्षात खरं होतंच असं नाही. मात्र या गोलंदाजाने ही किमया केली आहे.
हरारे | सलग 3 बॉल आणि सलग 3 विकेट्स, युवा गोलंदाजाने असा धमाका केलाय, जे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न होतं. झिंबाब्वेच्या वेस्ली मधवेरे याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. झिंबाब्वेच्या 22 वर्षाच्या या स्पिन ऑलराउंडरने नेदरलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हॅटट्रिक घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वेस्ली याने सामन्यातील 44 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर नेदरलंडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यासह वेस्ली याने क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आहे.
झिंबाब्वेला पहिल्या सामन्यात नेदरलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे झिंबाब्वेवर मायेदशातच मालिका गमावण्याचा धोका होता. दुसऱ्या वनडे सामन्यात झिंब्बावेने पहिले बॅटिंग करत 271 धावा केल्या. नेदरलंड 272 धावांच्या लक्ष्यासाठी मैदानात उतरली. मात्र या गोलंदाजाच्या कामगिरीमुळे 1 धावेने सनसनाटी विजय मिळवता आला.
मधेवेरे सामन्यातील 44 वी ओव्हर टाकायला आला. पहिल्याच बॉलवर मधेवेरे याने कॉलिन एकरमन याला आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर तेजा निदामनुरु आणि तिसऱ्या बॉलवर पॉल वॅन मीकरन याला बोल्ड करत हॅट्रिक पूर्ण केली.
मधेवेरे तिसरा बॉलर
मधेवेरे यासह झिंब्बावेकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. त्याआधी झिंबाब्वेकडून सर्वात आधी 1997 मध्ये एड्डो ब्रँडेस याने इंग्लंड विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तर 2014 मध्ये प्रॉस्पर उत्सेया याने दक्षिण आफ्रिका विरुद्द हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.
दरम्यान आता ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यानंतर आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हा हरारे स्पोर्ट्स क्लब इथे खेळवण्यात येणार आहे. हा तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे तिसरा सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
नेदरलंड प्लेइंग इलेव्हन | विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, टॉम कूपर, कॉलिन अकरमन, मुसा अहमद, स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), तेजा निदामनुरु, शरीझ अहमद, पॉल व्हॅन मीकरेन, फ्रेड क्लासेन आणि रायन क्लेन.
झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन | क्रेग एर्विन (कर्णधार), वेस्ली माधवेरे, गॅरी बॅलेन्स, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रायन बर्ल, क्लाइव्ह मदंडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, ब्रॅड इव्हान्स, तेंडाई चतारा आणि आशिर्वाद मुझाराबानी