एकीकडे विश्वचषकाची धामधूम, दुसरीकडे भारताच्या वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज मनप्रीत सिंह गोनीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ही माहिती पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) प्रवक्ते सुशील कपूर यांनी दिली.

मुंबई : भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज मनप्रीत सिंह गोनीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ही माहिती पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) प्रवक्ते सुशील कपूर यांनी दिली. ते म्हणाले, “मनप्रीत सिंह गोनी एक शानदार गोलंदाज आहे. त्याने आपल्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये पंजाब क्रिकेट संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. खूप मेहनत केल्यानंतर त्याने राष्ट्रीय संघात जागा मिळवली. सुशील कपूर यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून मनप्रीत गोनीच्या निर्णयाचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या”.
36 वर्षाच्या गोनीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये दोन वन डे, 61 अ दर्जाचे सामने, 55 प्रथम श्रेणीतील सामने आणि 90 टी-20 सामने खेळले आहेत. गोनीने आपला पहिला वनडे सामना 25 जून 2008 रोजी हाँगकाँग विरुद्ध खेळला होता. आपल्या करिअरमधील शेवटचा वनडे सामना 28 जून 2008 रोजी बांग्लादेश विरुद्ध खेळला होता. तर पहिला फर्स्ट क्लास सामना 3 नोव्हेंबर 2007 ला आंध्र प्रदेश विरुद्ध खेळला होता. तर शेवटचा सामना 7 जानेवारी 2019 रोजी बंगाल विरुद्ध खेळला होता. गोनीने आपला शेवटचा टी20 सामना रेल्वे विरुद्ध 2 मार्च 2019 रोजी खेळला होता. गोनी आपल्या करिअरमध्य फर्स्ट क्लासच्या 61 सामन्यात आतापर्यंत 196 विकेट घेतले आहेत. या दरम्यान त्याने 10 वेळा पाच-पाच विकेट आणि 1226 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गोनीच्या एका डावातील सर्वाधिक स्कोअर 69 धावा आहे.
आयपीएलमुळे प्रसिद्धी
गोनीला राष्ट्रीय पातळीवर इंडियन प्रीमियर लीगमुळे प्रसिद्धी मिळाली. गोनी वर्ष 2008 ते 2010 पर्यंत चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत होता. यानंतर 2011-12 हैदराबादकडून, तर 2013 ते 2017 किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आपल्या घरच्या संघात प्रवेश केला. यानंतर वर्ष 2018-19 मध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघातून आपल्या वेगवान गोलंदाजीची झलक दाखवली.
टोरंटो नॅशनल फ्रॅन्चाईजमध्ये सहभाग घेणार
गोनीने यावर्षी कॅनडामध्ये आयोजित होणाऱ्या लोबल टी-20 क्रिकेट टुर्नामेंटमध्ये टोरंटो नॅशनल फ्रॅन्चाईज टीममधून खेळणार आहेत.