भयंकर… लोकप्रिय क्रिकेटपटूवर विषप्रयोग, पाणी समजून प्यायला विषारी लिक्विड, एकच खळबळ
भारतीय संघातील खेळाडूची तब्येत अचानक बिघडल्याने एकच खळबळ माजली. विमानात बसताच त्याच्या तोंडात जळजळ होऊ लागली आणि उलटीही झाली. त्यानंतर त्याला तातडीने विमानातून उतरवण्यात आलं आणि नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Mayank Agarwal : भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल विमानात आजारी पडल्याने एकच खळबळ माजल. त्याच्या आजाराबद्दल खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आगरतळा येथे रणजी ट्रॉफी सामना खेळून झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल आपल्या संघासोबत परत येत होता. मात्र 30 जानेवारीला विमानात चढताच तो आजारी पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तो आयसीयूमध्ये आहे. या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. पाणी समजून चुकून विषारी द्रव प्यायल्याचे मयंकने सांगितले असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा द्रवपदार्थ त्याच्या सीटवर ठेवला होता, असेहीही मयंकने सांगितले. या घटनेनंतर मयंकच्या वतीने आगरतळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अचानक बिघडली तब्येत
कर्नाटकचा संघ गेल्या काही दिवसांपासून आगरतळा येथे होता, जिथे रणजी ट्रॉफी सामन्यात त्यांचा सामना त्रिपुराच्या टीमशी झाला. हा सामना जिंकल्यानंतर कर्नाटकचा संघ मंगळवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीमार्गे सुरतला रवाना झाला, जिथे त्याचा पुढील सामना रेल्वेच्या संघाशी होणाप आहे. कर्नाटकचे सर्व खेळाडू विमानात बसले होते मात्र अचानक मयंकची तब्येत बिघडली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मयंक अग्रवालने विमानातील एका पाऊचमधून काहीतरी द्रवपदार्थ प्यायला, मात्र त्यानंतर त्याला तोंडात जळजळ जाणवू लागली. त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला लगेच खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सीटवर ठेवल होतं पाऊच
या घटनेबद्दल, त्रिपुरा पश्चिम एसपी किरण कुमार यांनी पीटीआयला अधिक माहिती दिली. ‘ जेव्हा मयंक विमानात चढला तेव्हा त्याच्या सीटवर एक पाउच ठेवण्यात आला होता. मयंकच्या मॅनेजरचा हवाला देत एसपी किरण कुमार म्हणाले की, कर्नाटकच्या कॅप्टनने, मयकंने त्या पाऊचमधील द्रवपदार्थ पाणी समजून प्यायला. मात्र थोडसं लिक्विड पिताच त्याच्या तोंडात अचानक जळजळ होऊ लागली. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याची तब्येत बिघडल्याचे दिसताच, त्यालारुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मयंकच्या तोंडाला सूज आली होती आणि फोड आले होते’ असेही त्यांनी नमूद केले.
पोलिस करणार तपास
हा एखादा कट असल्याचा संशय व्यक्त करत मयंकच्या मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.याचा कसून तपास करण्यात येईल, असे त्रिपुराच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बंगळुरूला परतणार मयंक
कर्नाटक स्टेट क्रिकेट एसोसिएशन (KSCA) च्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, 31 जानेवारी रोजी मयंक बंगळुरू येथे परतू शकतो. आगरतळा येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी परवानगी देताच, तो परतू शकतो. रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा पुढचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना रेल्वे विरुद्ध होणार आहे. सूरतमध्ये दोन्ही संघात लढत होणार आहे. मात्र मयंकची तब्येत बिघडल्याने पुढील सामना खेळेल की नाही याबाबत आता साशंकता आहे.
गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला मयंक अग्रवाल सध्याच्या रणजी मोसमात दमदार कामगिरी करत आहे. त्याने गुजरात आणि गोव्याविरुद्ध सलग दोन सामन्यांत शतके झळकावली, तर त्रिपुराविरुद्धही त्याने अर्धशतक झळकावले. त्यांच्या संघाने हा सामना 29 धावांनी जिंकला.