चेन्नई सुपरकिंग्जची विजयी सलामी, विराटच्या आरसीबीचा सात विकेट्सने धुव्वा
चेन्नई : कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान लिलया पेलत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी दिली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने सात विकेट्स राखून आरसीबीवर मात केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना अवघ्या 70 धावात गुंडाळलं होतं. आव्हान सोपं असलं तरीही चेन्नईला विजयासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला. दहा चेंडू खेळून अनुभवी […]
चेन्नई : कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान लिलया पेलत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी दिली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने सात विकेट्स राखून आरसीबीवर मात केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना अवघ्या 70 धावात गुंडाळलं होतं.
आव्हान सोपं असलं तरीही चेन्नईला विजयासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला. दहा चेंडू खेळून अनुभवी फलंदाज शून्यावर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडूने 42 चेंडूत 28 आणि सुरेश रैनाने 21 धावांची खेळी केली. केदार जाधव आणि रवींद्र जाडेजा यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. आरसीबीला पहिलाच धक्का विराटच्या रुपाने बसला. सहा धावा करुन विराट बाद झाल्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. बंगळुरुकडून पार्थिव पटेललाच फक्त दोन अंकी (29) आकडा गाठता आला. एबी डिव्हीलियर्स, शिम्रोन हेटमेयर, मोईन अली यांच्यासारख्या खेळाडूंनाही खास कामगिरी करता आली नाही.
चेन्नईकडून हरभजन सिंह आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. हरभजनने विराट कोहली, डिव्हीलियर्स आणि मोईन अली या महत्त्वाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय रवींद्र जाडेजाने दोन आणि ड्वेन ब्रॅव्होने एका फलंदाजाला बाद केलं.
आरसीबीला विराटच्या नेतृत्त्वात गेल्या आठ मोसमांपासून अजून एकदाही चॅम्पियन होता आलेलं नाही. त्यामुळे गौतम गंभीरसारख्या दिग्गज खेळाडूनेही विराटच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यातच पहिल्याच सामन्यात मिळालेला हा पराभव विराटच्या जिव्हारी लागणारा आहे.